विधान परिषदेचे कामकाज सात वेळा तहकूब

0
9

मुंबई,दि.६ -भूसंपादन कायदा केंद्रात मंजूर होण्याआधी राज्य सरकारने याबाबत अधिसूचना का काढली? या विषयावरून विरोधकांनी सोमवारी विधान परिषदेत गोंधळ घातला. आश्‍चर्य म्हणजे सत्ताधारी शिवसेनेनेसुद्धा विरोधकांना साथ दिली. यादरम्यान, झालेल्या गदारोळामुळे तब्बल सात वेळा व नंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब झाले.
प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर लगेचच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेमंत टकले यांनी दिलेली स्थगन प्रस्तावाची सूचना कामकाजासाठी आली. यात केंद्राच्या भूसंपादन कायद्यासमोर अनेक अडचणी असल्याने तो अद्याप पारित झालेला नाही. त्या आधीच राज्य सरकारने अधिसूचना काढणे चुकीचे असल्याचा आक्षेप घेत सभागृहातील अन्य कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी टकले यांनी केली. उपसभापती वसंत डावखरे यांनी त्यावर शासनाने निवेदन करण्याचे निर्देश दिले. मात्र, इतक्यात शेकापचे जयंत पाटील यांनी त्यास हरकत घेत, ताबडतोब चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर डावखरे यांनी, सभापतींशी चर्चा करून वेळ निश्‍चित करण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा वटहुकूम नसून ती अधिसूचना असल्याचे सांगितले. मात्र, विरोधक सरकारविरोधी घोषणा देत हौदात उतरले. सुनील तटकरे यांनी ही अधिसूचना तातडीने मागे घेण्याची मागणी केली. दरम्यानच्या काळात विरोधकांचा गदारोळ वाढला आणि उपसभापती डावखरे यांनी पहिल्यांदा सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
कामकाज पुन्हा सुरू होताच परत घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी स्थगन प्रस्तावाला आमचा पाठिंबा नसला तरी भूमी अधिग्रहण कायद्यातील दुरुस्तीला आमचा विरोध आहे. त्यामुळे यावर चर्चा झालीच पाहिजे, असे शिवसेनेच्या डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या. तटकरे यांनी हाच धागा पकडत सरकारमधल्या एका पक्षाची वेगळी भूमिका असल्याने यावर चर्चा करण्याची मागणी केली. पुन्हा गदारोळ वाढला. त्यातच डावखरे यांनी पुढचे कामकाज पुकारले. पण वाढता गदारोळ पाहता त्यांनी पुन्हा अर्ध्या तासाकरता कामकाज तहकूब केले.
त्यानंतर तालिका सभापती प्रकाश बिनसाळे यांनी एका तासासाठी कामकाज तहकूब केले. उपसभापती वसंत डावखरे यांनी पुन्हा कामकाज सुरू केले. त्यावेळी बोलताना माणिकराव ठाकरे यांनी भूसंपादन अधिसूचनेचा विरोध करणारा ठराव मंजूर करण्याची मागणी केली. त्यामुळे पुन्हा सुरू झालेल्या गदारोळामुळे डावखरे यांनी पुन्हा १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. तालिका सभापती म्हणून स्थानापन्न झालेले रामनाथ मोते यांनी कामकाज सुरू होताक्षणीच अर्ध्या तासासाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू होताच तालिका सभापती बिनसाळे यांनी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना महापालिका, नगर परिषद सुधारणा विधेयक मांडण्यास अनुमती दिली. त्यापाठोपाठ महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नांदेड शीख गुरूद्वारा सचखंड श्री हुजूर साहिब सुधारणा विधेयक संमतीसाठी मांडले. यादरम्यान गदारोळ सुरूच होता. त्यामुळे कामकाज पुन्हा दहा मिनिटांसाठी सहाव्यांदा तहकूब झाले. कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा ते साधारण १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. या गदारोळातच सादर करण्यात आलेली दोन्ही शासकीय विधेयके मंजूर करण्यात आली आणि त्यानंतर लगेच उपसभापती वसंत डावखरे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.