पौर्णिमेला पथदिवे बंद ठेवा-पंतप्रधानांची सूचना

0
9

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि. ६-पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे शीतल चांदणे सर्वत्र पसरलेले असते. चंद्राच्या प्रकाशामुळे अंधारावर मात होते. त्यामुळे विजेची बचत करण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री पथदिवे बंद ठेवायला काहीच हरकत नाही, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी केली आहे.
देशभरातील सर्वच महापालिकांनी पौर्णिमेच्या रात्री रस्त्यावरील दिवे बंद ठेवण्याच्या दिशेने पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विजेची बचत ही आज काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला पथदिवे बंद ठेवून आपण विजेची बचत केली, तर त्याचा मोठा फायदा पर्यावरणाला आणि पर्यायाने देशालाही होईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांची आज राजधानी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. आपल्या देशात निसर्गाला देव मानण्याची पद्धत आहे. पण, निसर्गाच्या संवर्धनासाठी मात्र विशेष प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. असे मतही पंतप्रधानांनी व्यक्त केले.
आठवड्यातून किमान एक दिवस आपण कार किंवा दुचाकी चालवणार नाही, अशी प्रतिज्ञा देशातील प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. त्यादिवशी प्रत्येकाने सायकल चालवावी, असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधानांनी ओघानेच आपल्या भाषणात जमीन अधिग्रहण विधेयकाचा उल्लेख केला. ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सत्ता आहे, ते पक्ष या विधेयकाबाबत अपप्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, या विधेयकात कुठेही वनवासी, आदिवासी आणि जंगलातील जमीन असा शब्द नाही, असे पंतप्रधान म्हणाले