महिला आमदाराच्या गाडीने दाम्पत्याला उडविले

0
10

नाशिक – काल रात्री त्र्यंबकेश्वर येथे नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे यांच्या वाहनाने एका दाम्पत्याला उडविले असून या अपघातात पती-पत्नी दोघेही ठार झाले आहेत. या महिला आमदारांनी आपण या गाडीत नसल्याचा दावा केला असून दरम्यान पोलिसांनी ड्रायव्हरसह दोघांना ताब्यात घेतले आहे. तर मृतांच्या नातेवाईकांनी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे.

बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अंजनेरी जवळ शिवाजी विठोबा जगताप यांच्या मोटारसायकलला इनोव्हा कारने (एमएच-१५,बीएक्स-३६९९) जोरदार धडक दिली. या धडकेत शिवाजी जगताप जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी विमलबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. सदर गाडी ही आमदार हिरे यांच्या मालकीची आहे. चालक कार चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले असून हिरे गाडीत होत्या की नाही यावर स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी आमदार हिरेंवरच कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी कारचालकासह आणखी एकास अटक केली आहे.