वायुगळतीने १८ कामगारांना विषबाधा

0
15

कोराडी– येथील २ हजार १0३ मेगावॅट औष्णिक वीज केंद्रात बुधवारी सायंकाळच्या सुमारास डब्ल्यूटी प्लान्ट क्रमांक २ विभागात अचानक क्लोरिंग गॅस गळती होऊन १८ कामगारांना विषबाधा झाली. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे केंद्राच्या परिसरात एकच धावपळ उडाली. बाधित कामगारांना तातडीने मानकापुरातील कुणाल रुग्णालयात हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी येथील औष्णिक वीज केंद्रात क्लोरिंग गॅसचा उपयोग पाण्यातील जंतू मारण्यासाठी तसेच शेवाळ नष्ट करण्यासाठी केला जातो. बुधवार ८ एप्रिलला सायंकाळी ५ च्या सुमारास औष्णिक वीज केंद्रातील डब्ल्यूटी प्लान्ट क्रमांक-२ मध्ये असलेल्या कुलिंग टॉवर परिसरातील पाण्यात क्लोरिंग गॅस सोडण्याचे काम सुरू असताना अचानक गळती सुरू झाली. हा गॅस वीज केंद्रातील वातावरणात पसरल्यामुळे त्या ठिकाणी काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांना अचानक जीव गुदमरून घाबरल्यासारखे वाटू लागले. क्लोरिंग गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच जो-तो सैरभैर पळू लागला. दरम्यान, वीज केंद्रातील फायर ब्रिगेड कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन गळती होत असलेले सिलेंडर पाण्यात फेकून दिले आणि ३0 मिनिटांच्या आत परिस्थिती नियंत्रणात आणली. यादरम्यान रुग्णवाहिकेच्या मदतीने बाधित कामगारांना मानकापुरातील कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात संदीप शिंदे, अश्‍विन मानवटकर, पी.आर. भोसले, राजा दरेकर, एस.आर. कोनेर, एस. जी. दापूरकर, व्ही.टी. रूपनार, महादेव राजाराम रतनपुरे, राजू महल्ले, प्रेमचंद गोडबोले, महेंद्र खेडीकर, जयप्रकाश मानवटकर या कंत्राटी कामगार, मुख्य अभियंता व वाहनचालकाचा समावेश आहे.