आदिवासींच्या लढ्यासाठी वेगळा पक्ष काढू- पिचड

0
10

नाशिक : आदिवासी समाजाच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर भूमिका घेतली आहे. प्रसंगी, मंत्रीपदाचा राजीनामाही देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे पद आणि पक्ष आदिवासींपेक्षा महत्वाचे नसून वेळ आल्यास वेगळा पक्ष काढू, अशी ठाम भूमिका माजी मंत्री मधूकर पिचड यांनी आज येथे व्यक्‍त केली.

महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानांतर्गत गोल्फ क्‍लब येथून दुपारी साडेबारा वाजता काढण्यात आलेल्या महामोर्चावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या रस्ता सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पिचड म्हणाले, की धनगर आरक्षणाच्या मुद्यास सत्ताधारी विनाकारण हवा देण्याचे काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाच्या बाजुने भूमिका घेतली.

याशिवाय विधानसभेतही धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात सामावून घेण्याचा विचार करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री यांनी दिले. मात्र, आदिवासी कोण असावा हे घटनेत नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही समाजाला आदिवासींमध्ये सामावून घ्यायचे हे दुसरे कोणीही ठरवू शकत नाही. त्यामुळे बळजबरीने धनगर समाजाची घुसखोरी होऊ देणार नाही. यासाठी उभारलेल्या लढ्यात मी नेहमी समाजाच्या बरोबर राहील. त्यासाठीच या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकपासून सुरू झालेला हा महामोर्चा प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येणार आहे.