८९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
16

मुंबई,दि.16 : गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेल्या राज्य पोलीस दलातील पोलीस उपायुक्त, अधीक्षक, अप्पर अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. ३७ आयपीएससह एकूण ८९ अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले.गडचिरोली येथील अपर पोलीस अधिक्षकांनाही बदली मिळाली आहे.
मुंबईतून ७, नवी मुंबईतील ३ पोलीस उपायुक्तांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्या असून, तितकेच नवीन अधिकारी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी संबंधितांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
आयपीएस दर्जाच्या अधिकाºयांमध्ये राज्य राखीव दल-८ चे समादेशक चंदर किशोर मीना, नागपूर एसआरपीएफ-४ तुकडीचे समादेशक प्रणय अशोक तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे नागपूरचे अधीक्षक रंजन शर्मा, भिवंडीचे उपायुक्त अंकित गोयल यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याशिवाय मपोसे असलेल्या सोमनाथ घार्गे, मोहन दहिकर, डी.एस. स्वामी, श्रीकांत परोपकारी यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. यापैकी आयपीएस अधिकाºयांना कार्यकारी पद असलेल्या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल. त्याशिवाय विधान मंडळ सचिवालयाचे सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील यांची नवी मुंबईत गुन्हे अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली आहे. तेथील तुषार दोषी यांची मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली केली आहे. ठाणे पीसीआरचे अधीक्षक सुरेश मेंगडे यांची तसेच गोंदियाच्या अधीक्षक विनीता साहू यांची नवी मुंबई पोलीस दलात बदली केली आहे. तेथील परिमंडळ-१चे डॉ. सुधाकर पठारे यांची राज्य गुप्त वार्ता विभागात तर मुख्यालयातील उपायुक्त राजेश बनसोडे यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे.
मुंबईचे परिमंडळ-१चे अभिषेक त्रिमुखे यांची राज्य पोलीस मुख्यालयात साहाय्यक पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर परिमंडळ-१२चे डॉ. विनयकुमार राठोड, विक्रम देशमाने यांची एटीएसमध्ये बदली करण्यात आली आहे. फोर्सवनचे अप्पर अधीक्षक किरणकुमार चव्हाण व मुंबईतील उपायुक्त मनोज पाटील यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या नवनियुक्तीच्या ठिकाणाचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.