मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या – संजय राऊत

0
6

मुंबई, – मुस्लिमांच्या व्होट बँकेचे राजकारण सुरु असून हे सर्व थांबवण्यासाठी मुस्लिम समाजाचा मतदानाचा अधिकारच काढून घ्यायला हवा असे वादग्रस्त मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे. राऊत यांच्या विधानाचा काँग्रेसने निषेध केला असून राऊत यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणीही काँग्रेस नेते संदीप दिक्षीत यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या स्तंभलेखात वांद्रे पूर्व निवडणूक व एमआयएमचे दाखले घेत मुस्लिमविरोधी विधान केले आहे. ओवेसी बंधूंचा सापांची पिल्ले असा उल्लेख करत संजय राऊत म्हणतात, मुसलमानांचे दुःख दैन्य व अज्ञानाच्या नावाखाली प्रत्येक जण या व्होट बँकेचे राजकारण करतोय. निवडणुकीत मुस्लिम मतं खाणारा उमेदवार कधी हवा असतो तर कधी नको असतो. मुसलमान समाजाचे राजकारणात ऐवढेच महत्त्व असेल तर त्यांचा कधीच विकास होणार नाही असे राऊत यांनी सांगितले. मुस्लिम मतांचे राजकारण आणि सौदेबाजी रोखण्यासाठी या समाजाचा मताधिकार काढून घ्यायला हवा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती अशी आठवणही त्यांनी या लेखात नमूद केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची मागणी योग्यच होती असेही राऊत यांनी म्हटले आहे. मुस्लिम व्होट बँक हे वारुळ आहे, वारुळातील मुंग्या बाहेर पडल्या तरी सापाची पिल्ले वाढतातच. मतांसाठी अशा वारुळात हात घालणा-यांनी सावधान राहावे असेही या स्तंभलेखात नमूद करण्यात आले आहे.