३० एप्रिलपूर्वी विदर्भची घोषणा न केल्यास नेत्यांचे पुतळे दहन आंदोलन

0
5

नागपूर : केंद्रात सत्ता आल्यानंतर वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करू, असे तोंडी आणि लेखी आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिले होते. परंतु राज्यात आणि केंद्र शासनात सत्ता येऊनही आश्वासन देणारे आपल्या आश्वासनावरून मागे फिरत आहेत. त्यामुळे ३० एप्रिलपूर्वी विदर्भ राज्याची घोषणा न केल्यास विदर्भभर १ मे रोजी पोकळ आश्वासन देणाऱ्या नेत्यांचे पुतळे दहन आंदोलन राबविण्याचा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक आमदार निवास सभागृहात आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते.

बैठकीला समितीचे नागपूर शहर अध्यक्ष दिलीप नरवडिया, प्रबीर कुमार चक्रवर्ती, अनिल तिडके, विष्णू आष्टीकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केंद्र शासन प्रत्येक निर्णय तातडीने घेत असल्याचे सांगून वेगळ््या विदर्भाबाबत मौन का पाळल्या जाते, असा सवाल उपस्थित केला. पंतप्रधानांनीही विदर्भाचे तुकडे होऊ देणार नसल्याचे महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना वक्तव्य केले. माजी पोलीस महासंचालक प्रबीर कुमार चक्रवर्ती यांनी नेत्यांचे पुतळे जाळून दबाव वाढविण्याचे आवाहन बैठकीत केले. त्यासाठी १५ ते २२ एप्रिल दरम्यान समितीचे जिल्हाप्रमुख, प्रमुख कार्यकर्ते तालुकास्तरावर जाऊन स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनजागृती अभियान राबविणार आहेत. त्यात सभा, कार्यकर्ता बैठक, संघटनात्मक बांधणी करून १ मे रोजीच्या पुतळा दहन आंदोलनाची माहिती देण्यात येणार आहे.

प्रास्ताविक समितीचे नागपूर शहर अध्यक्ष दिलीप नरवडिया यांनी केले. बैठकीला अरुण केदार, शाम वाघ, अरविंद भोसले, अरुण मुनघाटे, अमिता मडावी, रमेश भुरसे, प्रकाश पांडे, राजेश श्रीवास्तव, प्रदीप धामणकर, राजेंद्र आगरकर, रफिक रंगरेज, प्रा. पुरुषोत्तम पाटील, प्रभाकर दिवे, दिलीप कोहळे, किशोर पोतनवार, अ‍ॅड पद्माकर टेंभुर्णेकर, निखील गवळी, तुषार हटवार, अण्णाजी राजेधर, गणेश शर्मा, दत्तुजी भेंडे, सुनील खंडेलवाल, प्रा. सतीश मोहिते, दिवाकर माणूसमारे, दत्ता तांदुळे, दीपक मुंडे, आर. एम. पटेल, प्रदीप देशपांडे आणि विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.