साखर कारखानदारी समोर सध्या मोठे संकट – मुख्यमंत्री

0
13

पुणे – साखर कारखानदारी समोर सद्या मोठे संकट उभे आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आता तात्पुरत्या उपाय-योजना करून भागणार नाही.तर पुढील दहा – पंधरा वर्षाचा रोडमॅप तयार व्हायला हवा.यासाठी आयोजित या दोन दिवसांच्या राज्यस्तरिय साखर परिषदेत होणार्‍या मंथन-चिंतनातून जे चांगले बाहेर पडेल त्या उपाय-योजनांची अमंलबजावणी राज्य सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मांजरी बुद्रुक येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय साखर परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार अध्यक्षस्थानी होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, कल्लाप्पाअण्णा आवाडे, शिवाजीराव पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, दिलीपराव देशमुख, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदींसह राज्यातील सर्व सहकारी व खासगी कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, मुख्य रसायन तज्ञ, शेती विभागाचे प्रमुख, मुख्य लेखापाल, आसवनी प्रमुख यावेळी उपस्थित होते. जागतिक बाजारपेठेत साखर कारखानदारी टिकविण्यासाठी या उद्योगात शेतकर्‍यांना विश्‍वात घेवून बदल करावे लागतील असे सांगून अधिक बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले साखर कारखाने, शेतकरी आणि राज्य सरकार एकत्रित येवून ठोस मार्ग काढावे लागतील.साखर कारखानदारी शेतकर्‍यांच्याच हितासाठी असली तरी उत्पादन खर्च आणि प्रत्यक्ष विक्रीतून मिळणारे उत्पन्न यात मोठा फरक आहे.पाण्याचे आर्थिक मुल्य लक्षात घेवून ऊस शेती ही ठिबक सिंचनवर करण्यात यावी त्यासाठी 3 वर्षाचा रोडमॅपही तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. इथेनॉलचा कोटा 28 कोटी लीटर इतका आहे, मात्र तो साखर कारखान्यांकडून पूर्ण होत नाही.साखर कारखान्यांना 2 हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याचे तसेच इथेनॉलवर मुंबईत असलेला जकात बंद करण्यासाठीचे प्रयत्नही करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अपेक्षेपेक्षा जास्त उस गाळप यंदा झाले असून अतिरिक्त साखरही तयार झाली आहे. तर बाजार पेठेत साखरचे दर घसरले आहेत.यातून मार्ग काढण्यासाठी आजच्या साखर परिषेदेतून तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल आणि त्यातून पुढील नियोजन ठरण्यास मदत होईल, असा विश्‍वास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविकपर भाषणातून व्यक्त केला.तर यापूर्वी ज्या-ज्या वेळी साखर उद्योगापुढे संकट उभे राहिले त्या-त्या वेळी केंद्र आणि राज्य सरकारने मदत केली.त्याप्रमाणे याही सरकारने साखर कारखानदारीला मदत कारावी, अशी मागणी साखर संघाचे अध्यक्ष मोहिते-पाटील यांनी केली.