संरक्षणावर खर्चाबाबत तडजोड नाही : पर्रीकर

0
10

पुणे : “देशाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षणावर पैसा खर्च न करणे मोठी चूक होऊ शकते. योग्य नियोजन आणि चांगला हेतू ठेवून खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, संरक्षणावरील खर्चाबाबत आमचे सरकार कोणतीही तडजोड करणार नाही‘‘, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (शनिवार) केले. स. गो. बर्वे ट्रस्ट आणि गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या वतीने शनिवारी (ता.25) आयोजित कार्यक्रमात पर्रीकर यांच्या हस्ते ‘डेव्हलपमेंट पॉलिसी इन महाराष्ट्र : प्रॉस्पेक्‍टस्‌ चॅलेंजेस अँड ऑप्शन‘ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्‍नांना त्यांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली.

पर्रीकर म्हणाले, “यापूर्वी संरक्षणावर विचार न करता खर्च केला गेला. परंतु भविष्यात योग्य हेतू आणि नियोजन करूनच खर्च केला जाईल. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी निधीची गरज भासल्यास तो उपलब्ध करून देऊ. लोकसंख्येचा विचार करता सर्व नागरिकांना सैन्य प्रशिक्षण देणे शक्‍य नाही. तरुणांमधील सकारात्मक शक्‍तीचा वापर योग्य रितीने करून घेणे आवश्‍यक आहे. एनसीसीच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिलिटरी कॅम्पसमध्ये सैन्य प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू आहे. इतर विद्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीत सैन्य प्रशिक्षण देण्याबाबत तसेच संरक्षण धोरण येत्या दोन-तीन महिन्यांत सरकार जाहीर करेल.‘‘

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स सरकारशी रफेल विमाने खरेदीबाबत केलेला करार हा देशहिताचा आहे. गेल्या 17 वर्षांत एकही विमान खरेदी केलेले नाही. योग्य किंमत, त्याची देखभाल-दुरुस्ती आणि मुदतीमध्ये मिळण्याच्या अटीवरच 36 रफेल विमानांची खरेदी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.