इस्त्राईलच्या भूमीत महाराष्ट्राचा सन्मान : अग्रीटेकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
18

मुंबई : इस्त्राईलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील ॲग्रीटेक या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्त्राईलचे कृषीमंत्री यायीर शमीर यांच्या हस्ते मंगळवारी संयुक्तरित्या झाले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देऊन संयोजकांनी महाराष्ट्राचाच गौरव केला.

या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा बहुमान महाराष्ट्राला दिल्याबद्दल इस्त्राईलच्या कृषी मंत्र्यांचे आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले, पाण्याची कमतरता असतानाही इस्त्राईलने उपलब्ध अत्यल्प पाण्याचा शेतीसाठी सुयोग्य व काटेकोरपणे वापर करून जगापुढे एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यादृष्टीने इस्त्राईलचे तंत्रज्ञान आम्हाला मार्गदर्शक ठरू शकेल. मात्र ‘मेक इन महाराष्ट्र’च्या सूत्राशी आम्ही बांधिल असल्याने हे तंत्रज्ञान आम्हाला केवळ आयात करायचे नसून ते महाराष्ट्रातच विकसित करायचे आहे. सूक्ष्म सिंचन, कापणीनंतरचे तंत्रज्ञान, कृषी उपकरणे या सर्व क्षेत्रात आम्हाला प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज आहे. या प्रदर्शनातून जगातील भूक मिटविण्यासाठी शेतीच्या शाश्वत विकासासाठी आणि हवामान बदलावर मात करण्याचे उपाय निश्चितपणे सापडतील, अशी आशा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली. नेटफीन या सूक्ष्म सिंचन यंत्र उत्पादक कंपनीला राज्यात उत्पादन करण्याचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यातील कृषी आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामध्ये इस्त्राईलसोबत संयुक्त प्रकल्प राबविण्याची इच्छाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. इस्त्राईलमधील कंपन्यांना सोयीचे व्हावे, यासाठी एमआयडीसीमार्फत स्पेशल इस्त्राईल इंडस्ट्रीयल झोन तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या प्रदर्शनाच्या निमित्ताने 100 भारतीय आणि इस्त्राईलमधील कंपन्यांनी ‘मेक इन महाराष्ट्र, इन कोलॅबरेशन विथ इस्त्राईल’मध्ये सहभाग नोंदविला आहे. नान दान-जैन इरिगेशनच्या स्टॉलचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी इस्त्राईल दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी मुख्य शास्त्रज्ञ कार्यालयातील चमूची भेट घेतली. इस्त्राईलमधील संशोधन आणि विकासासाठी काम करणारे हे एक सर्वात मोठे आणि महत्त्वाचे केंद्र आहे. विशेषत: कृषी संशोधन, पीक कापणीनंतरचे तंत्रज्ञान, अन्न साठवणूक आणि सौर कृषीपंप यामध्ये विविध प्रकल्प राज्यात राबविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी तेल अव्हिव विद्यापीठालाही भेट दिली. त्यांनी विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. जोसेफ क्लाफ्टर, उपाध्यक्ष रानान रेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यापीठातर्फे विविध विषयावर संशोधनपर सादरीकरण करण्यात आले. तेल अव्हिव विद्यापीठात सुमारे 30 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून सुमारे 5 हजार नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प येथे राबविण्यात येत आहेत.