डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे 6 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

0
15

मुंबई,,दि.3 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. 6) सायंकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.

दर वर्षी 51 व्यक्ती आणि 10 स्वयंसेवी संस्थांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यादी मोठी असल्याने त्यावर अद्याप काम सुरू असल्याचे सांगत सामाजिक न्यायमंत्र्यांनी यंदाच्या मानकऱ्यांची नावे गुलदस्त्यात ठेवली. सेवाभावी व्यक्तींना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख 15 हजार तसेच सेवाभावी संस्थेसाठी रोख 25 हजार आणि शाल, श्रीफळ, चंदनाचा हार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त व्यक्तींना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत देण्यात येते; तसेच त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी विश्रामगृहात उचित प्राधान्य देऊन आरक्षण देण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. 1971-72 पासून आजपर्यंत 1067 व्यक्ती आणि 137 संस्था असे 1204 पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.

या वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रिसर्च फेलोशिप सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमात डॉ. आंबेडकरांच्या समतेवर आधारित विचारांवरील लघुचित्रफीत व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारा माहितीपट दाखवण्यात येणार आहे; तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दर्शवणारे प्रदर्शनही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे भरवण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजमंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर स्नेहल आंबेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राजपुरोहित, कपिल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.