पप्पू कलानी यांची जन्मठेप कायम

0
12

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. ५ – इंदर भतिजा हत्येप्रकरणी जन्मठेप झालेल्या उल्हासनगरचा माजी आमदार सुरेश ऊर्फ पप्पू कलानीची याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्याची जन्मठेप कायम राहणार आहे.
२५ वर्षापूर्वी इंदर भतिजा हत्येप्रकरणी कलानीला कल्याण सत्र न्यायालयाने तीन डिसेंबर २०१३ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतरही कलानीने चार महिन्यापूर्वी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पप्पू कलानी सध्या आजन्म तुरूंगावासाची शिक्षा पुण्यातील येरवडा कारागृहात भोगत आहे.
राजकीय वैमनस्यातून २७ फेब्रुवारी १९९० रोजी घनश्याम भतिजा यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या पप्पू कलानी यानेच केल्याचा आरोप घनश्याम यांचे बंधू आणि एकमेव प्रत्यक्षदर्शी इंदर भटिजा यांनी करत आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. मात्र २८ एप्रिल १९९० रोजी सकाळी इंदरच्या अंगरक्षकाचीच बंदूक काढून घेत इंदरवर अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी पप्पू कलानीला दोषी धरले होते. त्याला सक्तमजुरीसह जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.