डॉ.आंबेडकरांच्या समतेच्या मार्गाने राज्य सरकार कृतीशील- मुख्यमंत्री

0
13

मुंबर्इ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांनी देशाला बलशाली बनविले आहे. त्यांचा समतेचा विचार घेऊन राज्य सरकार कृतीशीलपणे काम करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन 2014-15’ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे बुधवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, समाजकल्याण आयुक्त रणजित सिंह देओल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री म्हणाले, पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांनी शोषितांसाठी केलेल्या संघर्षपूर्ण सेवेची दखल घेऊन प्रोत्साहन म्हणून त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार अलंकार नसून या पुरस्काराने या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. लंडन येथील डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले घर राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे. जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ असलेल्या बाबासाहेबांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अध्यासन निर्माण करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. याशिवाय इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.
श्री.बडोले म्हणाले की, डॉ.बाबासाहेबांच्या विचारानुसार राज्य शासन मार्गक्रमण करत आहे. हे सरकार फक्त शाहू-फुले-आंबेडकर यांच्या नावाचा जप करणारे नाही तर त्यांचे विचार कृतीत आणणारे आहे. लंडन येथील डॉ. बाबासाहेबांची राहती वास्तू ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
श्री.दिलीप कांबळे म्हणाले, पुरस्कार विजेत्यांनी गावागावात अधिक चांगले काम केले तरच डॉ.आंबेडकरांचे विचार अंमलात येतील. यावेळी प्रधान सचिव उज्ज्वल उके यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाजसेविका श्रीमती सिंधुताई सपकाळ, डिक्कीच्या माध्यमातून दलित तरुणांना रोजगार निर्मितीसाठी विशेष कार्य करणारे श्री. मिलिंद कांबळे, ज्येष्ठ पत्रकार श्री. यदु जोशी, संगीताच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणारे श्री. प्रभाकर धाकडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते हॅपी होम अँड स्कूल फॉर दी ब्लाईंड, वरळी, मुंबई ; अन्नपूर्णा परिवार, पुणे ; अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र, वानवडी, पुणे ; कै. श्री. बाबूराव राघोजी देशमुख शैक्षणिक, सांस्कृतिक सामाजिक, कला व क्रीडा सेवाभावी संस्था, निढोरी, ता. कागल, जि. कोल्हापूर ; संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र, लातूर ; गोविंद महाराज गोपाल समाज विकास परिषद, अनसरवाडा, ता. निलंगा, जि.लातूर ; दीनदयाल बहु, प्रसारक मंडळ, रामकृष्ण नगर, मुलकी यवतमाळ ; संपूर्ण बांबू केंद्र, मु.लवादा, पो.धुनी, ता.धारणी, अमरावती ; भूवभूती शिक्षण संस्था, आमगाव, गोंदिया ; मातृसेवा संघ, नागपूर, यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.