मुख्यमंत्री १४ मेपासून चीनच्या दौऱ्यावर

0
5

मुंबई दि. १2 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे. “मेक इन इंडिया‘ या मोहिमेअंतर्गत चीनच्या प्रगतीचा आढावा घेणे तसेच तेथील उत्पादन कौशल्याचा सर्व अंगांनी विचार करणे, हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या यांनाही या दौऱ्यात समाविष्ट करण्यात आले आहे.
१४ ते १८ मे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात सहभागी होणार आहेत. ते १४ तारखेला झेंगझाऊ येथे फॉक्सकॉन या उद्योग नगरीला भेट देतील आणि फॉक्सकॉनचे अध्यक्ष टेरी गोयू यांच्याशी चर्चा करतील. १५ तारखेला ते पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत विविध देश आणि प्रांत नेत्यांच्या फोरमच्या बीजिंगमध्ये आयोजित परिषदेत सहभागी होतील.

मुख्यमंत्री १६ मे रोजी बीजिंग येथे चायना बँकेचे पदधिकारी आणि विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा करतील. याच दिवशी चीनमधील दुनहुआंग शहरात जाऊन ते औरंगाबादचा विकास दुनहुआंगच्या सहकार्याने तर दुनहुआंगचा विकास महाराष्ट्राच्या सहकार्याने करण्यासंदर्भात करार करतील. १८ मे रोजी क्यूइनडाओ(शँगडाँग) येथे आयोजित गुंतवणूक परिषदेत ते संबोधित करतील व त्याच दिवशी भारतात परततील.