अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार

0
12

पंढरपूर दि. १५ : अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे.
प्रशासन आ. रमेश कदम यांना पाठीशी घालत असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्याने आता कदम यांच्या चौकशीला सुरुवात झाल्याचे ढोबळे यांनी सांगितले. आ. कदम यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठीशी घालत असून आपण या गैरव्यवहाराची माहिती मागवल्यानेच अजित पवार आणि रमेश दादा यांनी आपल्या सूत गिरणीवर निवडणूक लादली असा गंभीर आरोप ढोबळेंनी केला आहे. राष्ट्रवादी कदमांच्या मागे भक्कम उभी राहत असल्याने हा भ्रष्टाचार बाहेर येईल की नाही अशी शंकाही ढोबळे यांनी व्यक्त केली.महामंडळाच्या माजी अध्यक्षांचा थेट 130 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात संबंध असून त्यांनी कर्ज दिलेल्या संस्था कागदावरच असल्याचे ढोबळे यांनी म्हटलं आहे. कदम यांनी हा पैसा मुंबई, औरंगाबाद अश्या ठिकाणी बांधकाम व्यवसायात लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता चौकशी सुरु झाली असली तरी कदम यात अडथळे आणत असल्याचा आरोप ढोबळेंनी केला आहे. मात्र ज्याप्रमाणे मोठमोठी भ्रष्टाचार प्रकरणं जिरली तसं हेही जिरेल अशी भीती ढोबळे यांनी व्यक्त केली.