पीकविम्याचे १६०० कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्या; विरोधी पक्षनेते मुंडेची मुख्यमंत्र्याकडे मागणी

0
13

पीकविम्याचे १६०० कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्या
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
मुंबईदि.२०-राज्यातील शेतकरी दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा तिहेरी संकटात सापडला आहे. राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेंतर्गत मंजूर झालेली १ हजार ६०० कोटींची भरपाई शेतकऱ्यांना त्वरीत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली.
धनंजय मुंडे यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार हेमन्त टकले, मधुसूदन केंद्रे, जयवंत जाधवही होते. २५ हजारांपेक्षा जास्त गावांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. २८ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे १७६ कोटींचा हप्ता भरला आहे. मात्र दुष्काळाने गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पीकविम्याच्या भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देणे गरजेचे असल्याचे मुंडे यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. तसेच शेतकऱ्यांना मिळणारी ही रक्कम विनाविलंब, एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी विनंतीही मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त क्षेत्रात बीड जिल्ह्याचा समावेश करा
राज्यातील यवतमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेता या क्षेत्रात विशेष मदत आणि सहाय्य करण्यासाठी शासनातर्फे सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या भागाला निश्चित फायदा होईल. पण त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, अवकाळी पाऊस यांच्यामुळे येथील शेतकरी त्रस्त आहे. यवतमाळ, उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याने बीड जिल्ह्यालाही सचिव दर्जाचा अधिकारी नियुक्त करून विशेष मदत आणि सहाय्य करावे, अशी मागणीही विरोधी पक्षनेते मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीत केली.