अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

0
84

मुंबई ता.२२: राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून येत्या आठवडाभरात तो जाहीर केला जाईल, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

राज्यात ९७ हजार अंगणवाडी सेविका असून त्यांना ४०५० रुपये मासिक मानधन मिळते. त्यात ९५० रुपये वाढ करण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविकांची संख्या ११ हजार असून त्यांना १९५० रुपये मानधन मिळते. त्यात ५५० रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. ९७ हजार मदतनीस असून त्यांना २ हजार रुपये मानधन मिळते. त्यात ५०० रुपये वाढ केली जाणार आहे. मानधनवाढीची एकूण रक्कम १७६ कोटी रुपये होते.

या शिवाय, अंगणवाडी सेविकांना दरवर्षी शासन एक हजार रुपये ‘भाऊबीज’ म्हणून देत असते. मात्र, गेल्यावर्षी (२०१४-१५) ही रक्कम देण्यात आली नव्हती. ती देण्याच्या आदेशावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सही केली आहे. लवकरच या रकमेचे वाटप केले जाईल, असे मुंडे यांनी सांगितले.