पर्यटनस्थळांची विकास कामे त्वरीत पूर्ण करा- डॉ. विजय सुर्यवंशी

0
4

जिल्हा पर्यटन समिती सभा
गोंदिया, दि २3: गोंदिया नैसर्गिकदृष्टया संपन्न जिल्हा आहे. जिल्हयाचा ४७ टक्के भाग वनाच्छादित आहे. जिल्हयातील नैसर्गिक पर्यटनस्थळांना जास्तीत जास्त पर्यटक भेट देण्यासाठी यावे आणि स्थानिकांना मोठया प्रमाणात यामाध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटन स्थळांची अपूर्ण अवस्थेतील विकासकामे त्वरीत पूर्ण करा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले.
जिल्हा पर्यटन समितीची सभा नुकतीच नवेगावबांध येथील वनविभागाच्या सभागृहात घेण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी बोलत होते. सभेला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रसंचालक संजय ठवरे, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी म्हणाले पर्यटनस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध असल्यास पर्यटक मोठया संख्येने येतात. पर्यटन स्थळांचा विकास करतांना पर्यटकांसाठी निवासाची, भोजनाची व मनोरंजनाची चांगली सुविधा उपलब्ध असली पाहिजे. नवेगावबांध या ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा पर्यटकांसाठी भविष्यात लवकरच उपलब्ध करुन देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवेगावबांध तलावाजवळ असलेल्या रॉक गार्डन, स्टेप गार्डन व म्युझिकल फाऊंटन दुरुस्तीचे कामे संबंधित कत्रांटदारांकडून तातडीने पूर्ण करुन हस्तांतरीत करुन घ्यावी. ही कामे लवकर झाल्यास येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन स्थळांचा आनंद घेता येईल. असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
पर्यटकांच्या निवासाच्या दृष्टीने नवेगावबांध येथील हॉलीडे होम्स, कापडी निवास तंबू आणि सभागृह पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील. अशी व्यवस्था करावी असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी म्हणाले जिल्हयातील नवेगावबांध व नागझिरा या पर्यटन स्थळांचे माकेंटिंग करण्यासाठी वनविकास महामंडळाने पुढाकार घ्यावा. नागपूर हे उपराजधानीचे शहर असल्यामुळे येथील अनेक उद्योगसमूहांना, तसेच ट्रॅव्हल्स कंपनीने व महाविद्यालयांना या पर्यटनस्थळांना भेटीचे निमंत्रण द्यावे व उपलब्ध सुविधेची माहिती द्यावी. त्यामुळे मोठया संख्येने पर्यटक जिल्हयात येण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. सभेला समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी गिरीष सरोदे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. राजेंद्र जैन व सावन बहेकार, जि.प.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.डी.लोखंडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर.शर्मा, महावितरण कंपणीचे अधिक्षक अभियंत के.ऐ.चव्हाण, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एच.के.हेडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विशेष कार्य अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, गोंदिया पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एस.एच.बन्सोड, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी व पर्यटन समितीच्या सदस्यांनी रॉक गार्डन, स्टेप गार्डन, म्युझिकल फाऊंटन, हॉलीडे होम्स आणि सभागृहाची पाहणी केली.