हिट अँड रन खटल्याच्या फाईल्स जळूून खाक

0
9

मुंबई दि. २८ – बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याशी संबंधित सर्व फाईल्स, कागदपत्रे मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाल्याची नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
२१ जून २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये सलमानच्या खटल्याशी संबंधित फाईल्स आणि कागदपत्रे आगीमध्ये जळाली. त्यामुळे सध्या राज्याच्या गृहखात्याकडे सलमानच्या खटल्याशी संबंधित कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत.
मन्सूर दर्वेश यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. २००२ पासून सलमानच्या खटल्यावर आतापर्यंत किती खर्च झाला. राज्य सरकारने किती वकिल नियुक्त केले याची माहिती मन्सूर दर्वेश यांनी मागितली होती.
दर्वेश यांनी दोन सरकारी विभागांकडे अर्ज केले होते. त्यावर सरकारने २०१२ च्या मंत्रालयाच्या आगीत कागदपत्रे जळाल्याने आम्ही तुम्हाला उपलब्ध करुन देऊ शकत नाही असे उत्तर दिले. या खटल्यात सप्टेंबर २०१४ पासून विशेष सरकारी वकिल प्रदीप घरत यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक सुनावणीसाठी त्यांना सहाहजार रुपये शुल्क दिले जाते याची सरकारला माहिती आहे.
मंत्रालय आग प्रकरणानंतर राज्य सरकारने जळालेल्या सर्व फाईल्स, कागदपत्रे पुन्हा तयार करु असे सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यांना ते शक्य झालेले नाही. सलमान खानचे प्रकरण त्याचे एक उदहारण आहे असे दर्वेश म्हणाले.
२८ सप्टेंबर २००२ च्या रात्री सलमानने बांद्रयामध्ये आपल्या आलिशान लॅण्ड क्रूझर गाडीखाली पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला चार जण जखमी झाले होते.
सहा मे रोजी सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना सलमानला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सलमानने लगेचच या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्याला जामिन मंजूर केला. विशेष म्हणजे सलमानला पाचवर्षांची शिक्षा होऊनही एकदिवसही तुरुंगात काढावा लागला नाही.