बाबा आमटेंच्या स्मृतीत दोन कोटी खर्चून अभ्यासिका उभारणार – सुधीर मुनगंटीवार

0
12

चंद्रपूर दि.६: बाबा आमटेंच्या स्मृतीत दोन कोटी खर्चून अभ्यासिका उभारण्यात येणार असून या अभ्यासिकेच्या माध्यमातून युपीएससी, एमपीएससीसाठी विद्यार्थी तयार करायचे आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते कै. बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित टपाल तिकीटाच्या सादरीकरण समारंभात बोलत होते.

यावेळी महापौर राखी कंचर्लावार, विकास आमटे, जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरूनुले, आमदार नाना शामकुळे, डॉ. संजय धोटे, सुरेश धानोरकर, पोस्ट मास्टर जनरल चार्ल्स लोबो, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण आदी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या यांच्या हस्ते टपाल टिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लहानपणापासून डायरी लिहीण्याची मला सवय आहे. आजचा दिवस डायरीत लिहीण्यासारखा आहे कारण बाबांच्या तिकीटाचे सादरीकरण करण्यात माझा खारीचा वाटा आहे. जनसेवा करणाऱ्यांच्या तीन तीन पिढ्या आमटे कुटूंबियाच्या रुपाने समाजाची सेवा करत आहे, हे दुर्मीळ वास्तव आहे. स्वर्गीय बाबांनी देशात चंद्रपूर जिल्ह्याच नाव मोठं केलं. बाबांचा वसा सर्वांनी पुढे चालवायला हवा. बाबाचं जन्म हिंगणघाटचा तर कर्मभूमी चंद्रपूर. बाबाचं जन्मगाव असलेल्या वर्धा आणि कर्मभूमी चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करायला मिळाले ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

गोंडवाना विद्यापीठाने बाबा आमटे यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करावे, अशी सूचना करीत पालकमंत्र्यांनी या केंद्रासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.

डॉ. विकास आमटे म्हणाले, आमटे परिवारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. बाबांना पुरस्काराचा मोह नव्हता. सेवा हाच त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार होता. मात्र पोस्ट विभागाने त्यांच्यावर तिकीट काढून बाबांच्या कार्याचा सन्मान केला आहे. यासाठी पालकमंत्री यांनी खूप प्रयत्न केले ही सुद्धा अभिमानाची बाब आहे. सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच आमचा आधार असल्याचेही ते म्हणाले. या प्रसंगी त्यांनी बाबांच्या अनेक स्मृतींना उजाळा दिला.

आमदार नाना शामकुळे, डॉ. संजय धोटे, सुरेश धानोरकर व पोस्ट मास्टर जनरल चार्ल्स लोबो यांनी बाबांच्या कार्याचा आढावा आपल्या भाषणातून घेऊन त्यांच्या सेवाव्रती कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली.

सुधीर मुनगंटीवार यांनी लिहलेल्या `शांतीदुताचा सन्मान` या छोटेखानी पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. बाबांवर तिकीट काढण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्यांची चित्रफित सुशील सहारे यांनी तयार केली, ती या कार्यक्रमात दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ऐश्वर्या भालेराव यांनी केले.