पानसरे हत्याप्रकरणात एसआयटीच्या हाती महत्त्वपूर्ण सीसीटीव्ही चित्रण

0
13

कोल्हापूर- दि.६-कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती शनिवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) पत्रकार परिषदेत दिली. पानसरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर कोणत्या दिशेने पळाले, याचा माग काढण्यात तपास यंत्रणांना यश आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी एसआयटीतर्फे बाईकवरील दोन हल्लेखोरांची प्रत्येकी चार रेखाचित्रेही जारी करण्यात आली. तसेच या हल्लेखोरांचे सीसीटीव्ही चित्रणही यावेळी जारी करण्यात आले. यामध्ये हल्लेखोर टेहळणी करताना आणि हल्ला केल्यानंतर पळून जाताना दिसत आहेत. हे दोन्ही हल्लेखोर २० ते २५ वर्षाच्या वयोगटातील असल्याचीही शक्यताही एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
१६ फेब्रुवारी रोजी गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर ते राहत असलेल्या सागरमळा परिसरात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा जखमी झाल्या होत्या. मात्र, उपचारादरम्यान, गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकार आणि पोलीस दोघांवरही हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी दबाव निर्माण झाला होता.