पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर रवाना

0
21

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.६- भारताचा परंपरागत मित्र व शेजारी देश असलेल्या बांगलादेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) सकाळी रवाना झाले. उभय देशांतील संबंध व सहकार्य अधिक प्रगाढ करणे, त्याची व्याप्ती आणखी विस्तृत करणे यावर भर दिला जाणार आहे. मोदींचा हा पहिलाच बांगलादेश दौरा आहे. या दौर्‍यात दोन्ही देशातील संबंध दृढ होतील, असे पंतप्रधानांनी ‘ट्वीट’ केले आहे. या दौऱ्यात भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान असलेल्या सीमावादाचा प्रश्न निकालात निघण्याची शक्यता आहे.
सकाळी पावणे दहा वाजेदरम्यान मोदी बांगलादेशाची राजधानी ढाका येथे पोहोचतील. मोदींसोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असतील. ममता बनर्जी शुक्रवारी रात्री बांगलादेशात पोहोचल्या. मोदींच्या स्वागतासाठी ढाका नगरी सज्ज झाली असून बांगलादेशात उत्सवासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
या दोन दिवसांच्या दौऱ्यात मोदी हे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्याबरोबर शिष्टमंडळ पातळीवरील चर्चा करतील. यामध्ये द्विपक्षीय संबंधांवर मुख्यतः चर्चा केंद्रित राहील. याखेरीज बांगलादेशातील प्रमुख राजकीय नेत्यांशीही मोदींच्या गाठीभेटी होतील. यामध्ये विरोधी पक्षनेते रोशन ईर्शाद, माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचा प्रामुख्याने समावेश असेल.