नागपूर आता आंतरराष्ट्रीय नकाशावर : नितीन गडकरी

0
8

नागपूर, दि.७-विदर्भासाठी मिहान प्रकल्प ही प्रतिष्ठेची बाब असून याठिकाणी एअर इंडिया आणि बोईंग यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेला एमआरओ आता पूर्णत: सज्ज झाला आहे. त्यामुळे जगभरातील विमाने याठिकाणी दुरुस्तीसाठी येऊ शकतात. त्यादृष्टीने विविध हवाई कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे. पण यामुळे नागपूर आता आंतरराष्ट्रीय नकाशावर आले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.मिहानमधील एमआरओ पूर्णत: सुसज्ज झाल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी नितीन गडकरी यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा दौरा आयोजित केला.या प्रकल्पासाठी मागील सरकारमधील प्रफुल्ल पटेल, खा. विजय दर्डा व माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी पाठपुरावा केला व त्यांचा देखील या प्रकल्पाच्या उभारणीत सहभाग असल्याचे गडकरी यांनी सांगितले. प्रकल्पाच्या पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
एमआरओमध्ये एकूण ६ विमानांची दुरुस्ती एकाचवेळी करता येईल अशी व्यवस्था आहे. याठिकाणी सर्व हवाई कंपन्यांना दुरुस्ती सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता इतर कंपन्यांशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पाचा करार झाला त्यावेळी बोईंग आणि एअर इंडिया यांच्यात बांधकाम व देखभाल अशी तरतूद होती. त्यासाठी बोईंगने १०० बिलियन डॉलरचा खर्च केला. पण देखभालीदरम्यान बोईंगच्या अभियंत्यांना व तंत्रज्ञांना अमेरिकेच्या वेतनश्रेणीनुसार वेतन द्यावे लागणार आहे. ही बाब भारतात शक्य नसल्याचे बोईंग प्रबंधनाच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी एमआरओच्या देखभालीची जबाबदारी एअर इंडियाकडे सोपविली असून आता या करारातून बोईंग बाहेर पडली आहे.
जगातील कोणतेही विमान याठिकाणी दुरुस्तीसाठी येऊ शकत असल्याने नागपूर आता आंतरराष्ट्रीय नकाशावर आले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. याठिकाणी रिपेअरसाठी हँगर उभारण्यात आले आहेत आणि अद्ययावत व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले.
सध्या या प्रकल्पात कार्यरत असलेले अभियंते मुंबईहून आलेले आहेत. पण आता मी मंत्रालयाकडून परवानगी घेऊन याठिकाणी स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्याची सोय करणार आहे. जेणेकरून मुंबईच्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षणार्थी तयार होतील व नागपुरात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विजय दर्डा, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. प्रकाश गजभिये, आ. सुनील केदार, आ. सुधीर पारवे, महापौर प्रवीण दटके, बोईंगचे सीईओ एच. आर. जगन्नाथ, महाव्यवस्थापक व्ही. जी. पाटील, एस. एस. काझी, ए. के. दत्ता, पीकेजी जयस्वाल, एच. आर. राऊत, सुनील अरोरा, अमरिकसिंग, एस. बी. क्षीरसागर व श्रीमती नाझा शंकर उपस्थित होते.
पंतप्रधान येणार
मिहानमधील एअर इंडिया एमआरओच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी उद्या चर्चा करणार आहे. मंत्रालयाच्या मार्फत त्यासंदर्भातील पाठपुरावा सुरू आहे व ते निश्‍चित उद्घाटनासाठी येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात आल्यानंतर एकाचदिवशी आयआयएम, नायपरचे भूमिपूजन, एमआरओचे उद्घाटन असा तिहेरी कार्यक्रम होणार आहे अशी माहिती मिळाली आहे.