छत्तीसगडमधील पोलीस चकमकीत सहा माओवादी ठार

0
6

वृत्तसंस्था
कोंडागाव,दि.७ – छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या पोलीस चकमकीत सुमारे सहा माओवादी ठार झाले. या चकमकीत अनेक माओवादी जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी माओवाद्यांच्या वेशातील दोन महिलांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळावरुन तीन बंदूक, दारुगोळ्यासह शस्त्रास्त्रांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
धनौरा विभागातील तिमडी गावात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार डीआरजी आणि डीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केल्याचे बस्तरचे महानिरीक्षक एसआरपी कल्लूरी यांनी सांगितले.
पोलिसांची चाहूल लागताच माओवाद्यांनी पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. सुमारे दोन तासांपर्यंत चाललेल्या या धुमश्चक्रीनंतर माओवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. जाताना त्यांनी काही मृतदेह ओढत नेल्याच्या खूणा दिसत आहेत. त्यामुळे परिस्थितिजन्य पुरावे, रक्ताचे डाग आणि मृतदेह ओढत नेल्याच्या खूणांवरुन कमीत-कमी सहा माओवादी मारले गेले असून अनेक जखमी झाले असावेत असे कल्लूरी यांनी सांगितले.
आपल्या साथीदारांचे मृतदेह घेऊन जाण्यात माओवादी यशस्वी झाले असले तरी येथे पोलिसांनी माओवाद्यांच्या वेशातील दोन महिलांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच घटनास्थळावरुन तीन १२ बोर बंदूक, बंदुकीच्या गोळ्यांचा साठा, डेटोनेटर, विजेची तार, बॅटरी आदी सामुग्री जप्त करण्यात आली आहे.