बोत्सा सत्यनारायणा यांचा कॉंग्रेसला रामराम

0
19

वृत्तसंस्था
हैदराबाद,दि.७-कॉंग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले आंध्रप्रदेश कॉंग्रेस समितीचे माजी अध्यक्ष बोत्सा सत्यनारायणा यांनी आज रविवारी पक्षाला रामराम ठोकला असून, वायएसआर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सत्यनारायणा अविभाजित आंध्रप्रदेश कॉंग्रेस समितीचे शेवटचे अध्यक्ष होते.
पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली दोनच दिवसांपूर्वी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. वायएसआर कॉंग्रेस पक्ष सत्तेत नसूनही मी त्या पक्षात प्रवेश केला आहे. निवडणूक किंवा सत्तेसाठी पक्षात प्रवेश केला नसून, तेलगू देसम् पक्षाच्या सरकारविरोधी धोरणांविरुद्ध लढा देताना माझ्या अनुभवाचा पक्षाला निश्‍चितच फायदा होईल, असे सत्यनारायणा यांनी वायएसआर कॉंग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश केल्यानंतर बोलताना सांगितले. माजी खासदार असलेली त्यांची पत्नी झांसी आणि आंध्रच्या उत्तर किनारपट्टीच्या भागातील अनेक नेत्यांनीही वायएसआर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षाने आपल्यासोबत न्याय केला नाही आणि आंध्रच्या विभाजनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वायएसआर कॉंग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, असे सत्यनारायणा यांनी सांगितले.