‘मार्ड’चे चार हजार डॉक्टर बेमुदत संपावर

0
7

मुंबई,दि. २: – विद्यावेतनात वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टर आज सकाळपासून बेुमदत संपावर गेले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ‘मार्ड’च्या शिष्टमंडळाची काल रात्री बैठक घेतली. मात्र यात कोणताही तोडगा निघाला नाही. बुधवारी (1 जुलै) ‘डॉक्‍टर्स डे’च्या दिवशी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील डॉक्‍टर काळ्या फिती लावून मागण्यांकडे दुर्लक्ष करणा-या राज्य सरकारचा निषेध केला.
राज्यातील 17 वैद्यकीय महाविद्यालयातील 4 ​हजार निवासी डॉक्टर आज सकाळी आठ वाजल्यापासून संपावर गेले आहेत. ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स’ (मार्ड) या संघटनेच्या संपाला इंडियन मेडिकल कौन्सिलने पाठिंबा दिला आहे. त्यात, मुंबई पालिकेच्या हॉस्पिटलांसह राज्यातल्या सर्व मेडिकल कॉलेजांमधील निवासी डॉक्टर सहभागी होणार असल्याने हजारो पेशंटांचे हाल होणार आहेत. मुंबईतील 1 हजार 500 डॉक्टर या संपात सहभागी आहेत. या संपामुळे महानगपालिकेच्या नायर, केईएम आणि सायन (लोकमान्य टिळक रुग्णालय) रुग्णालयातील सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. तसेच बाहेरगावाहून आलेल्या रुग्णाचे डॉक्टरांअभावी हाल होत आहेत.