‘त्या’ अनाथ मुलाच्या उपचारासाठी प्रशासन सज्ज

0
8

तिरोडा दि. २:येथील जगजीवन वार्डातील भूखबळी ठरलेल्या ललिता शिवकुमार रंगारी यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी राज्यशासनाने जबाबदारी स्वीकारली. आता आरोग्य प्रशासनाने त्यांच्या संपूर्ण चाचण्या व औषधोपचारासाठी पुढाकार घेतला आहे.
मागील तीन दिवसांपासून तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या मुलाला बुधवार (दि.१) दुपारी १२ वाजता वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम व उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांच्या उपस्थितीत केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात १0८ क्रमांकाच्या इर्मजंसी मेडीकल सर्व्हिस या अँम्बुलंसने हलविण्यात आले. बुद्धघोष शिवकुमार रंगारी (१८) असे त्या मुलाचे नाव असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी त्याचे संपूर्ण चाचण्या करवून घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात अत्याधुनिक यंत्रांची सोय नसल्यामुळेच सदर निर्णय घेण्यात आला. बुद्धघोषच्या डोळ्यांमध्ये काहीतरी फरक आहे. मात्र परिसरातील नागरिकांकडून जन्मापासूनच त्याचे डोळे तसे असल्याचे सांगण्यात आले आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात बुद्धघोषच्या डोळ्यांची फंडोस्कोपी व रेटिनोस्कोपी करण्यात येणार आहे. याशिवाय आयक्यू टेस्ट (इंटिलिजंट कोशंट), सिटी स्कॅन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी त्याच्या मामानेसुद्धा नाकारल्याने आता शासनालाच योग्य पाऊल उचलने भाग आहे.