एनआरएचएमअंतर्गत रिक्त पदाना प्रथमच सामाजिक आरक्षण लागू

0
15

गोंदिया दि.१0: उमेदवारांचे शैक्षणिक अहर्ता, अनुभव, वय आदी बाबतच्या पात्रता तपासून गुणवत्तेनुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विविध स्वरूपाचे रिक्त पदे भरण्यात येत होती. मात्र आता एनआरएचएमची सर्व रिक्त पदे सामाजिक आरक्षणानुसार भरण्यात येणार आहे.
या संदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ८ जुलै २0१५ रोजी नवा शासन निर्णय निर्गमित करून एनआरएचएमच्या कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे आता एनआरएचएमची सर्व कंत्राटी पदे सामाजिक आरक्षणानुसार भरली जाणार आहे. राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यान्वित करण्यात आली असून या अभियानात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोगय अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रक/प्रतिबंधक कार्यक्रम या योजनांचा समावेश होतो. केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानास २0१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीकरिता १३ टक्के, अनुसूचित जमातीकरिता सात टक्के, विमुक्त जाती अ साठी तीन टक्के, भटक्या जमाती ब ३.५ टक्के, भटक्या जमाती ड दोन टक्के, विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के व ओबीसी प्रवर्गासाठी १९ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.एनआरएचएम अंतर्गत जिल्ह्यात जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय तसेच जि.प. आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, शिपाई आदीसह विविध संवर्गाचे अनेक पदे रिक्त आहे. सदर रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे. एनआरएचएमच्या कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू करण्यात आल्याबाबतचे राज्य शासनाचे पत्र जि.प. आरोग्य विभागाला बुधवारी प्राप्त झाले आहे.