गडचिरोली जिल्हा कचेरीवर काँग्रेसचा मोर्चा धडकला

0
15

गडचिरोली दि.१0: शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार व सर्वसामान्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने गुरूवारी येथील इंदिरा गांधी चौकातून काढण्यात आलेला विशाल मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार युवक सहभागी झाले होते.
ट्रॅक्टर व बैलबंडीवर काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्त्व काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केले. येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर गोळा झाले.
या मोर्चात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश कुमरे, काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख विनोद दत्तात्रय जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, अँड. राम मेo्राम, पं.स. सभापती देवेंद्र भांडेकर, कल्पना वड्डे, शामिना उईके, पं.स. उपसभापती चंदू वडपल्लीवार, रहिम शेख, नंदू वाईलकर, नरेंद्र भरडकर, प्रभाकर वासेकर, समशेर खॉ पठाण, सतिश विधाते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, युवक काँग्रेसचे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष अतुल मल्लेलवार, राकेश रत्नावार, वैभव भिवापुरे, नितेश राठोड, राजू गारोदे, देवाजी सोनटक्के, सी. बी. आवळे, सुनिल खोब्रागडे, लता पेदापल्ली, महेंद्र ब्राह्मणवाडे, मनिष डोंगरे, जि.प. सदस्य सुकमा जांगधुर्वे, शांता परसे, नगरसेविका लता मुरकुटे, पुष्पा कुमरे, नंदू कायरकर, शरद मुळे, करूणा गणवीर, शंकरराव सालोटकर, किशोर वनमाळी, विलास ढोरे, राजेश ठाकूर, मेहबूब अली, मुक्तेश्‍वर गावडे, मनोहर पोरेटी, रवींद्र शहा, जि.प. सदस्य केशरी उसेंडी, बंडू शनिवारे, विनोद खोबे, माजी पं.स. सभापती पी. आर. आकरे, अमिता मडावी आदीसह काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवक सहभागी झाले होते.
काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मोर्चाला संबोधित केल्यानंतर काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे यांना दिले. आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, धानाला प्रती क्विंटल ३ हजार ५00, कापसाला प्रती क्विंटल सात हजार व सोयाबिनला प्रती क्विंटल चार हजार रूपये भाव देण्यात यावा, आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाचे शेतकर्‍याचे थकलेले १२ कोटी २८ लाख रूपयांचे चुकारे तत्काळ द्यावे, दुबार पेरणीसाठी बी -बियाणे व खतांचा मोफत पुरवठा करावा, सुधारित केंद्रीय भूमीअधिग्रहण कायदा रद्द करावा, शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करावे, रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला निधी उपलब्ध करून काम पूर्ण करावे, महिला व बाल रूग्णालय सुरू करावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाकरिता १00 टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, गडचिरोली जिल्हा विकास प्राधिकरणाला मंजुरी देऊन ते कार्यान्वित करावे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आलेल्या भाजप सरकारने तसेच राज्य सरकारने प्रचंड महागाई वाढविली आहे. धानाला प्रती क्विंटल १ हजार ८00 रूपये असा कवडीमोल भाव दिला जात आहे. शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले नाही. उलट गडचिरोली जिल्ह्यात बँक प्रशासनाने दुध व्यावसायिकावर सामान जप्तीची कारवाई केली. विदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्‍वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. मात्र अद्यापपर्यंत विदेशातील काळा पैसा भारतात आणण्यात आला नाही. केंद्र व राज्य सरकार कमालीचे असंवेदनशील झाले आहे. त्यामुळे जनतेने शासनकर्त्यांचे पुतळे जाळावेत, असे आवाहन काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण राज्यात मॉडेल स्कूल सुरू केले होते. मात्र भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारने मॉडेल स्कूल बंद केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पतप्रंधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत ४३ विदेशी देशांचा केला आहे. यात करोडो रूपये खर्च झाले आहेत. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचे काम भाजप पक्षाच्या शासनकर्त्याने चालविले आहे, अशी टिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.