गुटखा, पानमसाला आदी पदार्थांची निर्मिती, साठवणूक व विक्रीस एक वर्षापर्यंत बंदी

0
25

मुंबई दि. २० – : गुटखा, पानमसाला, सुगंधित/ स्वादिष्ट तंबाखू व सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू इत्यादी पदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण किंवा विक्री यास दि. 20 जुलै 2015 पासून एक वर्षापर्यंत प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

श्री.खडसे म्हणाले, अनेक देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर झालेल्या शास्त्रीय संशोधनावरुन हे निष्पन्न झाले आहे की, पानमसाला हे किंवा तत्सम पदार्थांचे स्वतंत्र घटक या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तोंडाचा, सबम्युकस फायब्रोसिस, कर्करोग, ॲक्युट हायपर मेग्नेशिया, हृदयरोग, पोटाचा कर्करोग, प्रजनन व्याधी, आतडे, श्वसनाचे रोग होतात. राज्यातील असे पदार्थ सेवन करणाऱ्या जनतेच्या आरोग्यावर आणि विशेषत: तरुण पिढीवर त्याचे प्रचंड दुष्परिणाम संभवतात. त्यामुळे अशा पदार्थांवर बंदी आणणे ही बाब वैधानिक आणि सामाजिकदृष्ट्या गरजेची आहे.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या कलम 30 (2) (अ) अंतर्गत यापूर्वी अधिसूचना दि.19.7.2012 च्या आदेशान्वये अन्न व सुरक्षा आयुक्त यांनी दि. 20 जुलै 2012 पासून एक वर्षाच्या कालावधीकरिता राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी गुटखा व पानमसाला यांचे उत्पादन, साठा, वितरण किंवा विक्री यावर बंदी घातली होती. त्यानंतर 2013 आणि 2014 मध्ये काढलेल्या आदेशात गुटखा/ पानमसाला यासोबत स्वादिष्ट/ सुगंधित सुपारी व स्वादिष्ट/ सुगंधित तंबाखू यांचाही समावेश बंदी आणलेल्या पदार्थात केला गेला असल्याचे श्री.खडसे यांनी सांगितले.