कृषी खात्यातही 125 कोटींचा घोटाळा?

0
12

मुंबई, दि. २० – फडणवीस सरकारमागील वादांचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नसून चिक्की व अग्निशमन यंत्राच्या कंत्राटानंतर आता कृषी खात्याने खरेदी केलेल्या बीबीएफ यंत्र (गादी वाफा व रूंद सरी-वरंबा बनविण्याचे मशिन) खरेदी कंत्राटात तब्बल १२५ कोटी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताविषयी भाजपाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या नुसार गादी वाफे तयार करण्यासाठी वापरल्या जाणा-या सारा यंत्राच्या खरेदीत कृषी खात्याने कंत्राटातील नियमांचे भंग केले आहे.

विदर्भ व मराठवाड्यातील शेतक-यांना कृषी विभागांतर्गत काही शेतीपयोगी मशिनरी पुरविण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. शेताची नागरट केल्यानंतर गादी वाफे तयार करण्याबरोबरच रूंद सरी व वरंबा बनविण्यासाठी बीबीएफ यंत्र शेतक-यांना उपयुक्त ठरेल असा दावा कृषी खात्याने केला होता. त्यानुसार मागील काही महिन्यांपासून या यंत्राचे वाटप झाले आहे. मात्र, ही यंत्रे शेतक-यांसाठी काहीही उपयोगाची नाहीत अशा तक्रारी शेतक-यांनी केल्या. या मशिनद्वारे पेरणी केल्यास 20 टक्के उत्पादन वाढेल असा दावा यंत्र पुरविणा-या कंपनीने केला होता. मात्र, तो साफ खोटा ठरला आहे. याशिवाय यंत्र खरेदीचे कंत्राट देतानाही नियमांचा भंग केला आहे. तसेच यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे.

या यंत्राची खरेदी करताना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून यंत्रांची तपासणी करणे बंधनकारक होते. मात्र ही तपासणी हैदराबादमधील एका त्रयस्त संस्थेकडून करवून घेण्यात आली. पंजाबराव देशमुख विद्यापीठाने या यंत्रात काही बदल सुचवले होते, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यामुळे विदर्भातील (अमरावती) भाजपचे आमदार सुनील देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाकडेही तक्रार दाखल केली आहे.