भटक्या विमुक्तांना क्रिमिलेयर संज्ञेमधून वगळण्याबाबत महिन्याभरात कार्यवाही – राजकुमार बडोले

0
16

मुंबई दि. २० –राज्यातील भटक्या विमुक्तांना क्रिमिलेयर संज्ञेमधून वगळण्याबाबत महिनाभरात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानपरिषद सदस्य हरिसिंग राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री.बडोले म्हणाले, या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यावर विधी व न्याय तसेच सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होऊन निर्णय घेण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेतील उपप्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, या संदर्भात अधिवेशनानंतर पहिल्या आठवड्यात या समाजातील संघटना तसेच विधीमंडळ सदस्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानपरिषद सदस्य सर्वश्री कपिल पाटील, भाई जगताप यांनी भाग घेतला.

अपंगांसाठीच्या संस्थांमधील विशेष शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक -दिलीप कांबळे

अपंगांसाठीच्या संस्थांमधील विशेष शिक्षकांच्या मागण्यांसदर्भात लक्ष देण्याची गरज असून या क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक घेऊन राज्य शासन लवकरच धोरण जाहीर करेल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधापरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी मुंबई उपनगरातील अपंग संस्थांना अनुदान तसेच शिक्षकांना नियमित वेतन मिळण्यासाठी शासनाने करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. कांबळे म्हणाले, अपंग संस्थांना निधीच्या उपलब्धतेनुसार अनुदान वितरित करण्यात येते. अपंग शाळा/ कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासाठी समाज सेवार्थ प्रणाली नव्याने विकसित करण्यात आली आहे. विशेष शाळेतील शिक्षकांच्या मागण्यांकडे शासन लक्ष देत असून तज्ज्ञांची बैठक घेऊन या संदर्भात धोरण तयार करण्यात येईल.
विधानपरिषद सदस्य सर्वश्री जोगेंद्र कवाडे, विक्रम काळे यांनी चर्चेत भाग घेतला.