आता तरी सभापती गृहप्रवेश करतील का?

0
7

रिकाम्या इमारतीत तब्बल ७५० युनिट विजेचा वापर

सुरेश भदाडे

देवरी,(ता.२४)- गेल्या तीन वर्षापूर्वी देवरी पंचायत समितीच्या आवारात तब्बल साडे चौदा लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला सभापती निवास उपेक्षित आहे. या नवनिर्मित वास्तूचा वापर नसतानासुद्धा सुमारे अडीच वर्षात ७५० युनिट वीज मात्र वापरल्या गेली, हे येथे विशेष. परिणामी, सभापती आतातरी गृहप्रवेश करतील काय? असा प्रश्न नागरिकांनी नवनियुक्त सभापती देवकी मडावी यांनी विचारला आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुका हा अतिदुर्गम भागात वसलेला असून नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून गणला जातो. देवरी पंचायत समिती सभापतिपद हे सामान्यतः ग्रामीण भागातून भरले जाते. या पदावर महिलांना पण संधी मिळत असते. अशावेळी त्यांना रात्री अपरात्री निवासाचा त्रास होऊ नये म्हणून शासनाने अतितत्काळ म्हणून साडे चौदा लाख रुपये खर्च करून पंचायत समिती आवारात एक सर्व सुविधायुक्त आणि प्रशस्त असे निवासस्थान मंजूर केले. या निवासस्थानाचे बांधकाम सुमारे तीन वर्षापूर्वी झाले असून २६ सप्टेंबर २०१२ ला वीज पुरवठासुद्धा करण्यात आला. असे असूनही हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या नवनिर्मित वास्तूत सभापती महोदय निवास करतील आणि जनतेला सहज उपलब्ध होतील, अशी जनतेची भाबडी आशा होती. पण एकाही सभापती महोदयांनी जनतेच्या इच्छेचा मान ठेवला नाही. मग सभापती म्हणून निवडून गेलेली व्यक्ती ही प्रचंड शासकीय निधी खर्च करून बांधलेल्या निवासस्थान राहत नसेल तर जनतेच्या घामाचा पैसा खर्च कशासाठी केला गेला? असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. शिवाय या इमारतीत आजतागायत एकही व्यक्तीने मुक्काम केल्याचे ऐकिवात नाही. मात्र, या इमारतीत साडे सातशे युनिट वीज वापर कोणी केला, याची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. शिवाय कर्मचारी वर्गात सभापती हेच खुद्द आपल्या निवासस्थानी राहत नसतील, तर कर्मचाèयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश कसे काय देऊ शकतात? अशी चर्चा गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पंचायत समिती सभापतिपदी देवकी मडावी या आरूढ झाल्या आहेत. किमान त्यांनी तरी या निवासस्थानी राहून आदर्श स्थापित करावा, आणि जनतेला कामाचे वेळी सहज उपलब्ध व्हावे, अशी आशा व्यक्त केली आहे. परिणामी, नवनियुक्त सभापती मडावी या जनतेच्या भावनांचा किती आदर करतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सभापती मडावी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.