वैनगंगेच्या खोऱ्यात भूकंपाचे केंद्रबिंदू

0
37

भूंकपाची खोली 10 किमी

गोंदिया जिल्हा बनला भूकंपप्रवण क्षेत्र

तुमसर-तिरोडा दरम्यान वैनगंगेच्या खोऱ्यात भूंकपाच्या केंद्राची शक्यता

खेमेंद्र कटरे

गोंदिया, दि. 24- गोंदियासह पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि शेजारील मध्यप्रदेशातील बालाघाट व छत्तीसगडमधील राजनादंगाव जिल्ह्यात काल गुरुवारी (दि.२३) रात्री ८.०५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूंकपाची तीव्रता रिस्टरस्केलवर 3.9 इतकी नोंदवली गेली. 10 किलोमीटर खोलीच्या या भूकंपाचे केंद्रबिंदू हा गोंदिया, बालाघाट व भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या खोऱ्यात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या काही वर्षाच्या खंडानंतर आलेल्या भूकंपाच्या धक्याने वातावरण नागरिकांत कमालीची दहशत आहे. असे असले तरी गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी लगेच तत्परता दाखवत जनतेला सोशल मिडीयासह इतरही माध्यमांच्या साहाय्याने पसरविण्यात येणाऱ्या अफवावंर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. कोणत्याही परिस्थितीत प्रशासन जनतेच्या पाठिशी असून जनतेच्या मनातील भिती दूर करण्याचाच प्रयत्न श्री. सूर्यवंशी यांनी केला. अनेक वर्षानंतर आलेल्या या भूकपांच्या धक्क्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एकीकडे डोळे वटारलेल्या पावसाने मात्र भूकपांच्या १० तासाआधीच आपली हजेरी लावली. त्यात या भूकपांने पुन्हा दुसरा धक्का दिला. या भुकपांची तीव्रता जरी कमी सौम्य असली तरी भविष्यात ही धोकाची घंटा असल्याचे प्रशासनाच्या हालचालीवरून दिसून येत आहे.
गोंदियासह भंडारा जिल्ह्याने या आधी सुध्दा भुकपांचे धक्के अनुभवले आहेत. परंतु, गुरुवारचा धक्का हा नागरिकांच्या कायम स्मरणात राहील. या भूकपांचा केंद्रबिंदू गोंदिया जिल्ह्यात निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास सिंधुदुर्गमधील २.९ रिस्टरस्केल भूकंपानंतर रात्री ८च्या सुमारास आलेला सातपुडा पर्वतरांगेतील भूकंपाने नागरिकांच्या चिंता वाढविल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते सकाळी सिंधुदुर्ग भागात आलेल्या भूकंपाचा धक्का हा अत्यंत कमी तीव्रतेचा होता. त्यावेळी भूगर्भातील हालचालीमुळे युरेशिअन प्लेट्स या इंडियन प्लेट्सला हलवू शकल्या नाही. परंतु, त्याचवेळी मिळालेल्या गॅपमधून या कंपणलहरी सांगलीच्या भूगर्भियमार्गे सातपुडा पर्वत रांगेतील गोंदिया पर्यंत पोचल्या. मोठी गॅप मिळाल्याने या दोन्ही प्लेट्समध्ये झालेल्या कंपणांच्या टक्करीमुळे हादरा बसला असावा, असा अंदाज भूगोलाचे अभ्यासक असलेले गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
दरम्यान, सोशल मिडीयावर अफवांचा धुमाकूळ माजल्याने नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.
काल रात्री ८.०५ वाजता दरम्यान शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भूगर्भात अचानक विमानासारखा कर्णकर्कश आवाज झाला. घरातील फर्निचर्स हलू लागले. शासकीय कार्यालयामधील खूर्चच्या देखील हलल्याने जिल्ह्यात भूकंपाची चांगलीच दहशत पसरली. या भूकंपाचा अनुभव जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी देखील प्रत्यक्ष अनुभवल्याचे सांगितले. पहिला धक्का ८.०५ वाजता तर दुसरा ८.०७ वाजता असे दोन धक्के बसले. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नागरिकांनी भूकंप अनुभवला. मात्र, अनेकांचा भूकंप झाल्यावर विश्वास बसला नव्हता. परिणामी, भ्रमणध्वनीवरून एकमेकांना विचारपुस करून खात्री करण्यात आली.
जिल्ह्यात भूकंपाच्या तीव्रता मोजणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने जिल्हा प्रशासनाने नागपूर येथील विभागासी संपर्क करून माहीती घेतली. तीव्रता जाणून घेण्यासाठी जवळपास दीड ते दोन तासाचा कालावधी लागला. जिल्हा प्रशासन पूर्णत: या आपत्तीला घेऊन सजग होते. तर दुपारीकडे सोशल मिडीयावर रात्री पुन्हा दोन ते तीन धक्के बसणार असल्याची अफवा पसरल्याने कमालीची दहशत पसरली होती. भरपावसात नागरिकांना जागून रात्र काढली. भूकंपामुळे जिल्ह्यात कुठलीही हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
यापूर्वी देखील जिल्ह्यात सौम्य हादरे बसले असल्याची माहिती वृद्ध देताहेत. मात्र, आजपर्यंतचा हा सर्वात मोठा भूंकपाचा धक्का कालचा असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीच्या आलेल्या एकाही भूकंपाची नोंद शासन दरबारी नाही, हे विशेष.

भूकंपाची खोली १० किमी- जिल्हाधिकारी सूर्यवंशी

काल कोकण किनारपट्टीसह विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्हा तथा मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ३.९ सिस्टर स्केल होती. भविष्यात कोणताही धोका नाही. गोंदियाला आलेला भुकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भाच्या फक्त १० किमीवर असल्याने भविष्यात चितेंचा विषय ठरू शकतो, असे मत जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
पुढे सूर्यवंशी यांनी नागरिकांना खोट्या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू गोंदिया जिल्ह्यातच असल्याचे भूवैज्ञानिकांनी कळविले आहे. साधारणतः ६ सिस्टरस्केलपेक्षा अधिक तीव्रता असेल तरच हानी होते. मात्र, काल बसलेला धक्का हा सौम्य स्वरूपाचा होता. अशी घटना एखाद्यावेळीच होते, असेही ते म्हणाले. भूगर्भातील प्लेट्स मूव्हमेंटचा हा प्रकार आहे. प्लेट्समुव्हमेंट शांत झाली आहे. आपल्याकडील भूगर्भाचा रॉकस्ट्रक्चर टणक असल्याने जास्त क्षेत्र प्रभावीत झाले नाही. आम्ही जबलपूर आणि हैदराबाद येथील भूगर्भ वैज्ञानिक संस्थेच्या संपर्कात आहोत. सध्यातरी कसलीही सूचना आली नाही. मात्र, दोन्ही संस्थांचे भूगर्भातील हालचालींकडे पूर्णत: लक्ष आहे. खोट्या अफवांना बळी न पडता नागरिकांनी मनात भिती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहनही डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मिडीयाला माहीती दिली.

रात्री भूकपांचे धक्के लागल्यानंतर सर्वच प्रसारमाध्यमांनी जिल्हाप्रशासनाकडे धाव घेतली. त्यावेळी या सर्व घटनेची माहीती गोळा करण्यात व्यस्त असलेले जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क करणाऱ्यांना स्वतः भ्रमणध्वनी करुन भूंकपाची माहिती दिली. तसेच प्रसारमाध्यमांनी जनतेला सावध राहण्याविषयी सांगावे अशीही विनंती केली.

बालपणापेक्षा कालचा अनुभव वेगळा -विनोद जांभूळकर

गोंदिया जिल्ह्यात काल गुरुवारी आलेल्या भूकंपाची तीव्रता बघता आपण याआधी लहानपणी जो अनुभव घेतला होता, त्यापेक्षा कितीतरी वेगळा अनुभव यावेळी आला. घरात टीव्ही बघताना अचानक मोठा आवाज कानावर पडला आणि त्याच वेळी घर हलल्यासारखे वाटले. यापूर्वी आपण कालच्या सारखा भूकपांचा अनुभव आला नव्हता. आपणच नव्हे तर आपल्या कुटुबांतील सर्व सदस्य या धक्याने घाबरले होते. त्या भीतीने आज लहान मुलांनाही शाळेत पाठविले नसल्याची प्रतिक्रिया शिवनगर गोंदियाचे रहिवासी विनोद जांभुळकर यांनी दिली.

धरणीकंपणामुळे हादरलो आणि अख्खी रात्र घराबाहेर काढली

गोंदियापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या दवडीपार येथील बहुतांश नागरिकांनी भूकपांच्या हादरामुळे पूर्ण रात्र घराबाहेर काढली. ग्रामपंचायत सदस्य मालिकचंद कटरे यांनी सांगतिले की, आपण जेवण करत असताना अचानक धक्का बसल्याने आपण हललो. सुरवातीला काहीच कळले नाही. परंतु, नंतर भूकंप आल्याची जाणीव झाल्यानंतर आजुबाजूचे आम्ही सर्व नागरिक पुन्हा भूकंप होईल या भीतीने संपूर्ण रात्रच घराबाहेर काढली.

आयुष्यातील भूकंपाचा मोठा धक्का- भैय्यालाल रहांगडाले

गोंदिया तालुक्यातील दांडेगाव येथील भैय्यालाल रहांगडाले यांनी सांगितले की, आपल्या आयुष्यातील कालचा भूकंप हा मोठा होता. आपण जेवण करुन खाटेवर पडलो असताना भूकंपाच्या धक्क्याने आपली खाट जोरात हलली. त्यामुळे सुरवातीला काहीच सुचेनासे झाले. पण लगेच भूकंप असल्याची जाणीव झाली. यापूर्वी 1987 व 1997 साली सुद्धा सौम्य धक्के बसले होते. परंतु, यावेळी भूकंपाची तीव्रता अधिक असल्याचे जाणवले. त्यामुळे अजूनही मनात भीती आहे.
याकुब मेमन फाशी प्रकरणाचे वृत्तांत मी टिव्हीवर बघत होते. रात्री ८.०५ वाजले होते. अचानक टिव्हीसमोरील साहित्य व पलंग हलू लागला. जमीन हलल्यासारखी वाटली. पण आधी घराजवळ ट्रॅक्टर सुरु झाल्याचा भास झाला. तेवढ्यात लोकांची धावाधाव झाली. भूकंप-भूकपं म्हणून लोक घराबाहेर पडली. घरची सर्व मंडळी खूप घाबरली. भूकपांच्या धक्क्यांचा हा पहीलाच अनुभव असल्याचे प्रा.सवीता बेदरकर (भुरले) यांनी सांगितले.

काळ आला होता, पण वेळ नाही- कल्पना कोरे

जेवणाची तयारी सुरु असतानाच अचानक भूगर्भात कंपण झाल्यासारखा आवाज आला. टिव्हीसमोरील साहीत्य पडले. भूकंपाचा झटका असल्याचे लक्षात येताच चांगलीच भीती वाटू लागली. घरातील आम्ही सर्व लोक अंगणात धावलो. पावसाचे दिवस असतानाही गावभरातील लोक रस्त्यावर गोळा झाले. रात्रभर भूकपांची भीती कायम होती. अनेकजन रात्रभर झोपले नाहीत. धक्क्यांची आठवण येताच आजही अंगावर काटे येतात. सुखरुप बचावल्याचा आंनद होतो. मात्र, त्यावेळी हृदयात धक झाल्याचे आठवणीत आहे. असे भूकंपाचे अनुभव कथन सालेकसा तालुक्यातील चिचटोला येथील कल्पना खुमचंद कोरे यांनी केले.

मनात धस्स झाले- राजेश पटले

नुकतेच जेवण करून कुटुंबासह टीव्ही पाहतो होतो. तेवढ्यात मोठा गडगडाट झाला. अचानक घर हलायला लागले. तेवढ्यात सर्व शेजारी घराबाहेर पडले. आधीतर वाटले की भले मोठे जड वाहन भरधाव गेले असेल. पण बाहेर येताच असे काही नव्हते. तेव्हा लक्षात आले की हा भूकंपाचा धक्का होता. लगेच लोकांना नेपाळचे विध्वंस आठवले. आणि क्षणता लहान मोठे चांगलेच धास्तावले. सर्व लोक घराबाहेरील खुल्या जागेत आलो. पुन्हा धक्का बसणार असे वृत्त सोशियमिडीयावर कोणीतरी खोडसांडपणे टाकले. त्यामुळे आम्ही सर्व बराच वेळ घराबाहेर काढला. सुमारे बारा वाजे सर्वांची समज काढून झोपायला लावले. मात्र, स्वतः साडेतीन पर्यंत बारीक लक्ष ठेवून होतो. नंतर सर्व काही ठिक असल्याची खात्री पटल्याने हायसे वाटले. अशी बोलकी प्रतिक्रिया देवरी तालुक्यातील मुल्ला येथील राजेश पटले यांनी दिली.