स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपत लोकशाहीला बळकट करुया – पालकमंत्री संदिपान भुमरे

0
7

औरंगाबाद, दिनांक 26  : आपल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये लक्षात ठेऊन लोकशाही बळकट करत तिला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने करण्याचे आवाहन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक  दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते झाले.  हा समारंभ पोलीस आयुक्त कार्यालयाच्या  ‘देवगिरी’ मैदानावर संपन्न झाला.

यावेळी खासदार इम्तीयाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर,पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, विक्रीकर सहआयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, आपला भारत हे एक मोठे लोकशाही राष्ट्र आहे. म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला. त्या दिवसापासून आपल्या देशात प्रजेची सत्ता सुरु झाली.

भारतात जनहितकारी, कल्याणकारी व धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था राबविली जाईल असेही अभिवचन संविधानात देण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा सार्वभौम लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते.   या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन आवाहन आहे की, जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन एक समानतेने सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहावे. तुम्ही-आम्ही आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास सामाजिक जीवनमान उंचावण्याबरोबरच आपल्या देशाला सामर्थ्यशाली महासत्ता बनवू शकतो. याची मला खात्री आहे. असे पालकमंत्री भुमरे यांनी शुभेच्छा संदेशात सांगितले.

या कार्यक्रमात राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकारी यांना पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्रीमती महक स्वामी सहायक पोलीस अधीक्षक वैजापूर ग्रामीण यांना परेड संचालनालात कमांडर म्हणून गौरविण्यात आले. तसेच शिलवंत रघुनाथ नांदेडकर पोलीस उपायुक्त शहर परिमंडळ यांना विशेष सेवा पदक, जयदत्त बबन भवर औरंगाबाद ग्रामीण यांना गडचिरोली जिल्ह्यात विशेष कामगिरी बद्दल सेवा पदक, पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले व गणेश माने यांना विशेष सेवा पदक तसेच रमेश काथार, बिनतारी संदेश विभाग यांना उत्कृष्ट सेवा प्रेसिडेंट पोलीस पथक, श्रीमती प्रविणा ताराचंद्र यादव, पोलीस स्टेशन सायबर औरंगाबाद शहर, प्रभारी अधिकारी पोलीस प्रशिक्षण केंद्र आंतरवर्ग उप-प्राचार्य प्रशासन म्हणून उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना युनिट होम मिनिस्टर मेडल, गोकुळ पुंजाजी वाघ सहायक फौजदार आर्थिक गुन्हे शाखा औरंगाबाद शहर उत्कृष्ट सेवा प्रेसिडेंट पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात पोलीस दल, अग्नीशमन दल, श्वान पथक, वरुन वाहन अतिशिघ्र प्रतिसाद पथक दंगा विरोधी पथक यांच्यासह विविध पोलीस पथकांनी मान्यवरांना मानवंदना दिली.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक यांची भेट घेत नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.