जीएसटी कॉमन पोर्टलवर 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करा- मुनगंटीवार

0
8

मुंबई, दि. 16 :  राज्यातील जे व्यापारी मुंबई विक्रीकर कायदा, केंद्रीय
विक्रीकर कायदा, ऐषाराम कर कायदा  या खाली नोंदित आहेत त्यांना वस्तू आणि
सेवा कर कायद्याखाली जी.एस.टी कॉमन पोर्टलवर ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत
नोंदणी करणे बंधनकारक आहे म्हणून राज्यातील नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी दि.
१५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१६  या कालावधीत अशी नोंदणी करावी असे
आवाहन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

जीएसटी कॉमन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवश्यक असे लॉगइन आयडी व पासवर्ड
विक्रीकर विभागाला पाठवले असून त्याचे संबंधित व्यापाऱ्यास वाटप
करण्यासाठी विभागाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे आज
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी
वित्त विभागाचे प्रधान सचिव व्ही गिरिराज,  विक्रीकर आयुक्त राजीव जलोटा,
सहाय्यक विकीक्रर आयुक्त पराग जैन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात  ही सुविधा जे व्यापारी दि. ३१ ऑगस्ट २०१५ पूर्वी
नोंदीत आहेत  तसेच ज्यांचे पॅन (PAN) व्हॅलिडेशन झाले आहे अशा
व्यापाऱ्यांना उपलब्ध असेल. त्यांनाच लॉग इन आयडी आणि पासवर्ड पुरवण्यात
येत आहेत. दि. १ सप्टेंबर २०१५ पासून पुढे नोंदित झालेल्या तसेच पॅन
व्हॅलिडेशन न झालेल्या व्यापाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लॉग इन आयडी आणि
पासवर्ड पुरवण्यात येतील. पहिल्या टप्प्यातील अशा व्यापाऱ्यांची संख्या
७ लाख ६३ हजार ७५१ इतकी आहे.

विक्रीकर विभागाने यासाठी  ३५  टी २०१६ हे परिपत्रक निर्गमित केले असून
त्यात लॉग इन आयडी आणि पासवर्ड वाटप करण्यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया
नमूद केली आहे.  सध्या पात्र असणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी, युजर मॅन्युअल
आणि परिपत्रक विक्रीकर विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशी माहिती ही
वित्तमंत्र्यांनी यावेळी दिली.