काळी-पिवळी वाहनातून १४ लाखांची रोकड जप्त-जिमलगट्टा पोलिसांची कारवाई

0
9

आलापल्ली,,दि.१६: केंद्र शासनाने पाचशे व एक हजारच्या नोटा बंद केल्यानंतर आज दुपारी जिमलगट्टा पोलिसांनी १४ लाखांची रोकड घेऊन प्रवास करणाऱ्या एका इसमास चौकशीसाठी ताब्यात घेतले. संतोष चिंतावार रा.सिरोंचा असे त्याचे नाव आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिमलगट्टा पोलिस तपास करीत आहेत. श्री.चिंतावार यांचे सिरोंचा येथे हार्डवेअरचे दुकान असून, ते आपल्या परिवारासह सिरोंचाला जात होते, अशी माहिती आहे.

काळ्या पैशावर अंकूश लावण्यासाठी शासनाने पाचशे व एक हजारच्या नोटा बंद करुन नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, जुन्या साठविलेल्या पाचशे व एक हजारच्या नोटांची मोठी रोकड बँकेत जमा करण्याचे काम काही इसम करीत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. जिमलगट्टा पोलिसही आज आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील जिमलगट्टा वळणावर पाळत ठेवून होते. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आलापल्ली येथून एक काळीपिवळी टॅक्सी सिरोंचाकडे जाताना दिसताच पोलिसांनी ती अडवून तपासणी केली. यावेळी संतोष चिंतावार यांच्याकडे तब्बल १४ लाखांची रोकड आढळून आली. पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली असून, ती चिंतावार यांच्याकडे कुठून आली याविषयी आयकर विभागाला कळवून विस्तृत माहिती घेण्यात येणार आहे.