डिजिटल क्रांतीत सहभागी होऊन लघु उद्योजकांनी व्यापार वाढवावा – राज्यमंत्री रविंद्र चव्हाण

0
12

मुंबई, दि. 2 : देशाच्या सध्या होत असलेल्या प्रगतीमध्ये डिजिटायझेशन अर्थात माहिती तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे. जीवनातील सर्वच क्षेत्रात डिजिटायझेशनमुळे शहरे व गावांचा विकास होत आहे. भविष्यकाळात माहिती तंत्रज्ञानामुळेच देशाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. त्यामुळे लघु उद्योजकांनी डिजिटायझेशनच्या क्रांतीत सहभागी होऊन आपला व्यापार वाढवावा, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
जागतिक व्यापार केंद्र व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रिज यांच्या वतीने मुंबईतील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे आयोजित ‘एसएमई इन्फोकॉन : डिजिटायझेशन अ गेम चेंजर फॉर एसएमईस् या विषयावरील परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष विजय कलंत्री, जागतिक व्यापार केंद्राचे कार्यकारी संचालक वाय. आर. वरेरकर आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, डिजिटायझेशन विषयावरील या परिषदेमुळे लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केंद्र शासनानेही ‘डिजिटल इंडिया’ व ‘मेक इन इंडिया’ हे दोन उपक्रम उद्योजकांसाठी सुरू केले आहेत. त्यामुळे उद्योगांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपला व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करता येतील. ‘डिजिटल इंडिया’मुळे देशातील खेडी एकमेकांशी जोडली गेली आहेत.  डिजिटल क्रांतीमुळे मागास भागाचा विकास होत आहे. डिजिटल लॉकर, ई एज्युकेशन, ई आरोग्य, इ साईन, राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी संकेतस्थळ, डिजिटल इंडिया ॲप अशा माध्यमातून देश एका वेगळ्या डिजिटल क्रांतीकडे पाऊल टाकत आहे. येत्या दोन वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेले दिसतील.यावेळी विविध विषयांवर तज्ज्ञांनी चर्चा केली. श्री. कलंत्री यांनी प्रास्ताविक केले तर श्री. वरेरकर यांनी आभार मानले.