गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे चालना

0
11

मुंबई, दि. 2 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील खाणीतून होणारे लोहखनिजाचे उत्पादन पूर्ववत सुरू झाले असून उत्पादित लोहखनिज घुग्गुस येथे प्रक्रियेसाठी पाठविण्यास येत आहे. याशिवाय विद्युतवाहिन्या उभारण्याचे कामही सुरू झाले असून तेही लवकरच पूर्ण होत आहे.  याशिवाय आलापल्ली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य विकासाचा आराखडा पुढील महिन्यापासून कार्यान्वित होत आहे.
गेल्या महिन्यात त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करुन विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच सुरजागड येथील खाणीतून काढण्यात येणाऱ्या लोहखनिजावर
स्थानिक पातळीवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे.त्यासाठी लॉयडस् स्टील अँड एनर्जी या कंपनीतर्फे चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोह प्रकल्प उभारण्यात येत असून त्याचा आरंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील स्थानिक एक हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येथील खनिजावर स्थानिक पातळीवरच प्रक्रिया झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याने त्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. त्यास या कंपनीने सकारात्मक प्रतिसाद
दिला असून लवकरच हा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण होणार आहे.
नक्षलवादी हल्ल्यांमुळे काही प्रमाणात बाधित झालेली कामे पूर्ववत सुरू करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. विशेषत: सुरजागड खाणीतून लोहखनिज काढून ते प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचवणे सुरळीत व्हावे, यासाठी खास पोलीस चेकपोस्ट सह एक बटालियन तैनात करण्यात आली आहे. या बंदोबस्तामुळे खाणीतील उत्खनन सुरू झाले असून त्याची सुरक्षित वाहतूकही होत आहे.आलापल्ली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) कौशल्य विकास विषयक प्रशिक्षण देण्यासाठी लॉयडस् कंपनीने ही संस्था दत्तक घेतली आहे. पुढील महिन्यात या अभ्यासक्रमाचा आराखडा कार्यान्वित होईल.