साडेपाच वर्षांतील सर्वात मोठी घसरण

0
17

मुंबई- भारतीय शेअर बाजारात मंगळवारी साडेपाच वर्षांतील सर्वात मोठी घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८५४.८६ अंकांनी, ३.०७ टक्क्यांनी घसरून २६,९९७.४६ अंकांवर आला. ही आतापर्यंतची एकाच सत्रातील सातवी सर्वात मोठी घसरण आहे, तर निफ्टी २५१.०५ अंकांनी, ३ टक्क्यांनी घटून ८१२७.३५ वर बंद झाला. यापूर्वी ६ जुलै २००९ मध्ये सेन्सेक्स ८६९.६५ अंकांनी घसरला होता.

त्या वेळी निफ्टी २५८.५५ अंकांनी कोसळला होता. सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. तेल व नैसर्गिक वायू इंडेक्समध्ये सर्वात जास्त ४.२ टक्के घसरण दिसून आली. सेन्सेक्सच्या यादीतील हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता सर्व २९ समभाग घसरणीसह बंद झाले. यातील २२ कंपन्यांचे समभाग दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरले.एफआयआयच्या विक्रीने घसरणीला हातभार लावला.
पुढे तेजीची चिन्हे
आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टमेंट बँक हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनच्या (एचएसबीसी) मते, स्थितीत लवकरच सुधारणा होईल. आर्थिक सुधारणांची पावले व व्याजदरातील कपातीमुळे मागणीत वाढ होईल. कंपन्यांच्या आकडेवारीत सुधारणा होईल आणि शेअर बाजारात तेजी राहील. २०१५ मध्ये बाजार १६.७ टक्के परतावा देण्याची शक्यता आहे.

फॅट फिंगर ट्रेडचा संशय
राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) वायदापूर्ती सौद्यात (फ्युचर) फॅट फिंगर ट्रेडिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यात सट्टेबाजांनी हात धुऊन घेतल्याची चर्चा रंगली. मात्र एनएसईच्या अधिकाऱ्यांनी व्यवहार सुरळीत असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात व चुकीच्या नावाने , अनियंत्रित किमतीत व्यवहार केले जातात त्यास फॅट फिंगर म्हणतात.

शेअर बाजार घसरणीची कारणे

ग्रीसमधील मळभ : ग्रीसवर कर्जाचा डोंगर आहे. ग्रीस कर्ज फेडण्याच्या स्थितीत नाही. ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. ग्रीस युरोपीय समुदायाच्या बाहेर पडण्याचीही शक्यता आहे.
तिमाही निकालाची धास्ती : देशातील कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक निकाल जाहीर होणार आहेत. जाणकारांच्या मते या निकालात नफा स्थिर राहील. रिअ‍ॅल्टी व धातू कंपन्यांचे निकाल निराशाजनक राहण्याची शक्यता आहे.

विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री : विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) मंगळवारी जितके समभाग खरेदी केले त्यापेक्षा १५७० कोटी रुपये जास्त किमतीचे समभाग विकले. सोमवारी एफआयआयनी ४७२ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली होती.

कच्च्या तेलाची घसरण
ब्रेट क्रूड ५२ आणि अमेरिका क्रूड पिंपामागे ५० डॉलरच्या खाली आले आहे. जून २०१४ मध्ये या किमती ११५ डॉलरवर होत्या. जागतिक अर्थव्यस्थेतील ही मरगळ मानण्यात येते. युरोपसह चीन आणि जपानमध्ये आर्थिक घडामोडी मंदावल्या आहेत. त्यामुळे तेलाची मागणी वाढत नसून उत्पादन मात्र वाढते आहे.