शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जलयुक्त शिवार अभियान- जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे

0
22

उस्मानाबाद.दि.16:- पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जात असल्यामुळे दरवर्षी दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो, त्यामुळे पाण्याचे महत्तव ओळखून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज केले. तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाऱ्याची पाहणी त्यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपविभागीय अधिकारी चेतन शिरासे, गजानन वडणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, साहेबराव घुगे,ॲड.अनिल काळे, प्रभाकर मुळे, विजय शिंगाडे, सचिन घोडके, इंद्रजित देवकते, पद्माकर घेडके, सत्यवान सुरवसे, आबा करमुळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थिती होती.
मंत्री प्रा.शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत केलेल्या कामामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होवून त्यांचा विकास होणार आहे.
आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिमेंट बंधारे, नदी, नाले खोलीकरण यासारख्या कामांना निधीची मागणी केली होती. त्यांच्या निधी मागणी प्रस्तावास मान्यता देत जिल्हयास 4 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केली. जलसंधारण विभागांतर्गत माळुंब्रा येथे 9.56 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची त्यांनी यावेळी पाहणी केली. त्याचबरोबर मौ.मसला दहीवडी येथे पाझर तलाव दुरुस्ती, तुळजापूर खुर्द येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी करुन यावेळी मंत्री.प्रा.शिंदे यांनी जलपुजन केले.