मुख्यमंत्र्यांनी नाभीक समाजाची जाहीर माफी मागावी-खा.नाना पटोले

0
24

गोंदिया,दि.१६ः- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ नोव्हेंबरला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाण्याच्या शुभारंभप्रसंगी जाहिर सभेत बोलतांना नाभिक(न्वाही)समाजाबद्दल अपशब्द काढून समाजाचा अनादार केल्याचे नाभिक समाजाने म्हटेल आहे. मुख्यमंत्र्याच्या त्या शब्दाचा निषेध नोंदविण्यासाठी व मुख्यमंत्र्यांनी जाहिर माफी मागावी यासाठी येत्या १८ नोव्हेंबरला राज्यातील सर्व राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे.त्यादिवशी तालुकास्थळापासून जिल्हाधिकारीपर्यंत मुख्यमंत्र्याच्या त्या वक्तव्याचा निषेध नोंदविला जाणार आहे.दरम्यान आज गुरुवारला गोंदियात भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले आले असता त्यांना गोंदिया तालुका नाभिक समाजाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.नाभिक समाज संघटनेच्या राज्य नेत्यांनी सुध्दा 12 बलुतेदार ओबीसी समाजाला सुध्दा या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या महाराष्ट्रात मनुवादी मानसिकतेच्या मुख्यमंत्र्याचे हे वक्तव्य ओबीसी समाजासाठी घातक असल्याची टिका करीत संघटित होण्याचे आवाहन सुध्दा त्यांनी केेले आहे.
निवेदन स्विकारल्यानंतर खासदार पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागास असलेल्या नाभिक समाजाच्या व्यवसायाबद्दल केलेली टिप्पणी समाजाचा अपमान करणारी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाजाची जाहिररित्या माफी मागावी असे म्हणाले.आपण मागाससमाजाच्या हक्कासाठी लढणारे असल्याने नाभिक समाजाच्या या आंदोलनात आपला पाठिंबा असून समाजाचा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
समाजाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात १८ नोव्हेंबरला जिल्हामुख्यालयी एकत्र येत सकाळी ११ वाजता नेहरु चौकातून मुख्यमंत्र्याच्या विरोधात निषेध मोर्चा नेहरु चौकातून काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जोपर्यंत आपल्या समाजाची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत निषेध आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार असल्याचेही सुरेश चन्ने यांनी म्हटले असून जिल्हाधिकारी यांना निषेधाचे निवेदन सुध्दा देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.आज गोंदिया तालुका नाभिक समाजाच्यावतीने मुख्यमंत्र्याच्या नावे असलेले निषेधाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे,मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक मनोहर दाभाडे यांना निवेदन सादर केले.