विस हजाराची लाच घेणार्‍या महिला गृहपालास अटक

0
17

नांदेड,दि.22ः- शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहातील भोजन पुरवठा बिल मंजूर करून त्याचा अनुकुल अहवाल सहाय्यक आयुक्तांना पाठवून रकमेचा धनादेश देण्यासाठी 20 हजाराची लाच घेणार्‍या महिला गृहपाल कु. किशोरी अनंतराव अलोने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रकमेसह अटक केली आहे. हदगाव येथील शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहातील भोजन पुरवठा बिल मंजूर करण्यासाठी तसेच समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांना अनुकुल अहवाल सादर करून रकमेचा धनादेश देण्यासाठी येथील महिला गृहपाल कु. किशोरी अनंतराव अलोने यांनी संबंधित गुत्तेदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

मंगळवारला लाच स्विकारण्याचे मान्य केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  दि. 21 नोव्हेंबर रोजी वसतीगृह परिसरात सापळा रचून कु. किशोरी अलोने यांना 20 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. कु. किशोरी अलोने या मुळच्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील रहिवाशी आहेत.या प्रकरणी हदगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक संजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक कपिल शेळके, पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे, पोहेकॉ नामदेव सोनकांबळे, शेख चॉंद अली, महिला पोलीस कर्मचारी आशा गायकवाड यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक कपील शेळके हे करीत आहेत.