चित्रांश कंपनीच्या कार्यालयात हंगामा

0
8

नागपूर : दुकानांमध्ये टीव्ही संच लावून, त्यातून जाहिरातीचे प्रक्षेपण करून, त्या मोबदल्यात दुकानमालकांना महिन्याला सात हजार रुपये देण्याची योजना चित्रांश टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनी शहरात राबवित आहे. या योजनेतील काही लाभार्थ्यांचे धनादेश न वटल्याने, त्यांनी मंगळवारी कंपनीच्या श्रीराम टॉवर येथील कार्यालयात हंगामा केला.

चित्रांश टेक्नॉलॉजी प्रा.लि. ही जाहिरात कंपनी आहे. कंपनीने ७ ते ८ महिन्यांपासून शहरात अभिनव योजना राबविली आहे. कंपनी शहरातील दुकानमालकांकडून ३५ ते ४० हजार रुपये घेऊन टीव्ही संच लावते. या टीव्हीवर मोठमोठ्या कंपनीच्या जाहिरातीचे प्रक्षेपण करते. या मोबदल्यात दुकानमालकांना महिन्याला सात हजार रुपये दिले जातात. काही लाभार्थ्यांचा धनादेश दोन महिन्यापासून वटला नाही. हे लाभार्थी काही दिवसांपासून कार्यालयाच्या चकरा मारत आहे. अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करीत आहे. मात्र त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने, आज शेकडो लाभार्थ्यांनी कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. पैशासाठी कार्यालयात जोरदार हंगामा केला. दरम्यान सदर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी केल्याने, लाभार्थ्यांना पुन्हा मोबदल्याचा चेक देण्यात आला. कंपनीच्या कार्यालयात जवळपास तीन तास हंगामा सुरू होता. लाभार्थ्यांनी कंपनीवर आरोप केले असले तरी, या प्रकरणाची कुठलीही तक्रार पोलिसांकडे केली नाही.

कंपनीने आमची फसवणूक केली

४या कंपनीने लाभार्थ्यांशी तीन वर्षाचे अ‍ॅग्रीमेंट केले आहे. यात पहिले सहा महिने लाभार्थ्यांना ७ हजार, ६ ते १२ महिन्यापर्यंत ८ हजार व १२ ते ३६ महिन्यापर्यंत १०,००० रुपये देईल, असा करारात उल्लेख आहे. मात्र पहिल्या सहा महिन्यातच कंपनीचे धनादेश वटविण्यात अडचणी येत आहे. हंगामा करणाऱ्या काही लाभार्थ्यांनी कंपनी आमची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला. आमचे पैसे परत द्या, आपला टीव्ही घेऊन जा, अशी मागणी त्यांनी केली