रेपो रेटमध्ये कपात, गृहकर्ज होणार स्वस्त

0
15

मुंबई, दि. ४ – रिझर्व बँकेने सर्वसामान्यांना दिलासा देत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने गृहकर्ज, वाहनकर्जाच्या व्याज दरात कपात होण्याची दाट शक्यता असून रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्याने देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.

मोदी सरकारने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पाला शेअरबाजारात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी बुधवारी रिझर्व बँकेनेही रेपो रेटमध्ये कपात केली. रिझर्व बँकेने ७.७५ टक्क्यांवर असलेला रेपो रेट ७.५० टक्क्यांवर आणला आहे. तर कॅश रिव्हर्स रेशिओ जैसे थे ( ४ टक्के) ठेवण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात रिझर्व बँकेने दुस-यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. जानेवारीमध्ये संक्रातीच्या कालावधीतही रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली होती. रेपो रेटमध्ये आणखी कपात करण्याचा निर्णय अर्थसंकल्पानंतरच घेऊ असे सुतोवाच रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले होते. अर्थसंकल्प सादर झाल्याच्या चार दिवसांमध्येच राजन यांनी रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करत सर्वसामान्यांना दिलासा दिला.

रेपो रेटमध्ये कपात झाल्याने आता व्याज दरातही कपात होण्याची चिन्हे असून यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज अशा सर्वच प्रकारची कर्ज स्वस्त होतील. कर्ज स्वस्त झाल्यास आर्थिक उलाढालीला वेग येईल अशी आशा आहे.