ग्रामीण भागातील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू -देवसरकर

0
10

नांदेड दि.05 ः-    सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या कारभाराला नागरिक अक्षरश: कंटाळले असून ग्रामीण भागातील बहुतांश गावातील सिंगल फेज डी.पी. बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या भागातील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करून दिलासा द्यावा, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी आज अधीक्षक अभियंता श्री वाहने यांना भेटून निवेदनाद्वारे दिला आहे.
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. गुरे-ढोरे व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, त्यातच जिल्ह्यातील अनेक गावात सिंगल फेज डी.पी. बंद असल्यामुळे व डी.पी.च्या पायल्या कमकुवत झाल्या असून डीपी काम करत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. लाईट नसल्यामुळे नागरिक हैराण झाले असून अनेक गावांत प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक नागरिकांच्या तक्रारीनंतर आज महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री वाहने यांची भागवत देवसरकर यांनी भेट घेऊन महावितरणने जिल्हाभर दुरूस्ती मोहीम राबवून तात्काळ बंद अवस्थेत डी.पी.ची दुरूस्ती करून त्या ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा मागणीचे निवेदनही दिले.    यावेळी शिष्टमंडळात प्रशांत आबादार, परमेश्वर काळे, अनिल देवसरकर, अविनाश कदम, शेख रहीम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.