शेअर बाजाराने गमावले 1 लाख कोटी

0
9

मुंबई – मध्य-पूर्व आशियातील राजकीय तणावामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने तब्बल 802 अंश गमावले आहेत. बाजारातील गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वांत मोठी घसरण असून, घसरणीमुळे शेअर बाजाराने 1 लाख कोटी रुपये गमावले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (निफ्टी) निर्देशांकही 188 अंशांनी कोसळला होता.

गेल्या आठवड्याभरात मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असणार्‍या 10 सर्वाधिक मूल्याच्या म्हणजेच ब्लूचिप कंपन्यांनी एकत्रित एक लाख कोटी रुपयांचे भांडवल गमावले आहे. अस्थिर जागतिक राजकीय परिस्थितीमुळे मुंबई शेअर बाजारात देखील विक्रीचा मारा सुरू झाला होता. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले होते.

या पडझडीत टीसीएसने सर्वाधिक भांडवल गमावले आहे. टीसीएसने 18,304.32 कोटी रुपयांचे भांडवल गमावले असून आता एकूण बाजार भांडवल 4 लाख 92 हजार 855 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 27 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोल इंडिया या तिन्ही कंपन्यांचे एकत्रित 13 हजार कोटी रुपयांनी भांडवल कमी झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने देखील 13 हजार 767.85 कोटी रुपये गमावले असून बाजार भांडवल 2 लाख 62 हजार 656 कोटी रुपये झाले आहे. त्यापाठोपाठ कोल इंडियाचे बाजार मूल्यांकन घसरले आहे. कोल इंडियाचे भांडवल 13 हजार 043 कोटी रुपयांनी कमी झाले असून 2 लाख 19 हजार 462 कोटी रुपये झाले आहे.

सौदी अरेबियाने येमेनमधील हुथी येथील बंडखोरांवर हवाई हल्ले सुरू केल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सहा टक्‍क्‍यांनी वाढल्या. या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेले आठवडाभर निराशेचे वातावरण होते. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज (सोमवार) रुपयाही घसरला आहे. रुपया 62.50 रुपये प्रती डॉलरच्या पार व्यवहार करतो आहे. गेल्या आठवड्यात रुपया डॉलरच्या तुलनेत 62.41 वर बंद झाला होता.