मतदानयंत्रावर झळकणार उमेदवारांचे फोटो

0
11

वृत्तसंस्था,
मुंबई-निवडणूक जवळ आली प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यातच काही जण आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी त्याच नावाचा दुसरा उमेदवार उभा करून मतं खाण्याचा प्रकारही करतात. हा प्रकार लोकसभेपासून तर महापालिका निवडणुकीपर्यंत बर्‍याच वेळा दिसून येतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होंटिंग मशिन वर उमेदवाराच्या नावासमोर त्याचा फोटो लावण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या या नव्या प्रयोगाची अंमलबजावणी १ मेपासून होणार्‍या देशभरातील सर्व निवडणुकांत होणार आहे. जय – पराजयात अवघ्या काही मतांचा फरक असेल, अशा निवडणुकांत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावाचा आणखी एक उमेदवार मतविभागणीसाठी रिंगणात उतरविला जातो. एकाच नावाचे दोन उमेदवार पाहून मतदार संभ्रमात पडतात. त्याचा परिणाम राजकीय समीकरणांवरही होतो. अनेक तगड्‌या उमेदवारांचा पराभव अशाच संभ्रमावस्थेमुळे झाल्याची उदाहरणे आहेत.
सुप्रीम कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. ईव्हीएमवर प्रत्येक उमेदवाराचे नाव, निवडणुकचिन्ह यादरम्यान त्याचा फोटोदेखील असावा, असे निवडणूक आयोगाने सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे.
उमेदवारांना अर्ज भरतानाच निवडणूक अधिकार्‍यांना आपला फोटो द्यावा लागेल. उमेदवाराने आपला फोटो न दिल्यास निवडणूक निर्णय अधिकारी अशा उमेदवाराला अर्जांच्या छाननीआधी तो देण्याची नोटीस बजावेल.