पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी बँकांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावा-जिल्हाधिकारी अरूण डोंगरे

0
9

नांदेड,दि.8:- जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी बँकानी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी पीक कर्ज वितरण आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस आमदार डि. पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेश धुर्वे, तसेच जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक पि.एन. निनावे, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, कृषी उपसंचालक माधूरी सानवणे तसेच विविध बँकाचे अधिकारी आणि प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.

बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये, यासाठी बँकांकडे दत्तक असलेल्या गावांची यादी शाखेत दर्शनी भागात लावावी, कर्ज मागणी अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांची यादी सर्व बँक शाखांसाठी एक समान असावी, तसेच त्याबाबतचे परिपत्रक अग्रणी बँकेने काढावेत आणि शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येवू नये. अनेकदा शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होत नाही, परिणामत: तक्रारी वाढत आहेत. यापुढे बँक कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सौजन्याची वागणूक देण्यात यावी. पीक कर्ज वितरण गतीने पुर्ण करण्यासाठी बँकांनी गावोगावी पीककर्ज वितरण मेळावा आयोजित करण्याबाबतही सुचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिल्या .

या आढावा बैठकीदरम्यान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके व्यतिरिक्त अन्य बँकांचे कर्ज वाटप उद्दिष्टांच्या तुलनेत खूप कमी आढळल्याने नाराजी व्यक्त करीत एकूण उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ 13.66 टक्के म्हणजे 268.75कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरण झाले आहे. यात सहकारी क्षेत्रातील बँकांचा वाटा 94.86 टक्के असून त्यांनी 169.42कोटींचे कर्ज वाटत केले आहे. ग्रामीण बँकेने उद्दिष्टाच्या13.59 टक्के ( 37.66 कोटी ) ईतके तर खाजगी क्षेत्रातील बँका पीक कर्जवाटपात खूप मागे आहेत. त्यांनी केवळ उद्दिष्टाच्या 2.83 टक्के ( 38.46 कोटी ) ईतकेच कर्ज वाटप केले आहे.

पीक कर्ज सहाय्यता मदत केंद्र

शेतकऱ्यांच्या तक्रारींचा गतिने निपटारा करण्यासाठी तसेच योग्य मार्गदर्शनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्ज मदत/सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली असून1077 या टोलफ्री व 02462 – 235077 या कार्यालयीन क्रमांकावर पीक कर्ज अनुषंगाने संपर्क करावा असे आवाहन केले.यावेळी बैठकीस उपस्थित आमदार डि.पी.सावंत,आमदार वसंतराव चव्हाण यांनी देखील पीक कर्ज वितरण अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.